सिंधुदुर्ग : बिबट्याची केली जाळून हत्या, दोडामार्ग तालुक्यातील घटना : पंजे छाटून नखांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:36 AM2018-01-06T10:36:13+5:302018-01-06T10:39:19+5:30
दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना उगाडे येथील परिसरात फासळीत अडकलेल्या बिबट्याची जाळून हत्या करण्याची गंभीर घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. वनविभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वनविभागाचे कर्मचारी उगाडे येथे तत्काळ रवाना झाले आहेत. या बिबट्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची देखील तस्करी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
दोडामार्ग : तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना उगाडे येथील परिसरात फासळीत अडकलेल्या बिबट्याची जाळून हत्या करण्याची गंभीर घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
वनविभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वनविभागाचे कर्मचारी उगाडे येथे तत्काळ रवाना झाले आहेत. या बिबट्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची देखील तस्करी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांबर, रानडुक्कर, गवे आदींच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. तिलारी जंगल परिसर व उगाडे परिसरात अशा घटना उघडकीस आल्या आहेत.
त्यामुळे शिकाऱ्यांना गजाआड करण्यासाठी वनविभाग वेगवेगळया उपाययोजना राबवित असला तरी शिकारीचे प्रमाण मात्र काही कमी झाले नाही. असाच एक प्रकार उगाडे येथील जंगल परिसरात घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनविभागाची झोप उडाली आहे.
उगाडे परिसरात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या फासळीत आठ दिवसांपूर्वी बिबट्या अडकला.
या बिबट्याला जाळून त्याची हत्या करण्यात आली. तसेच त्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची तस्करी देखील करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबतची माहिती वनविभागाला समजल्याने वनपाल चंद्रकांत खडपकर व वनरक्षक संजय नीळकंठ हे घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वनविभागावर शिकारी शिरजोर
वनविभाग एकीकडे शिकारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शिकारीचे प्रमाण मात्र वाढतच आहे. उगाडे येथील प्रकारावरून हे पुढे आले आहे. त्यामुळे वनविभागावर शिकारी शिरजोर झाले असून त्यामुळे वनविभागाची झोप मात्र चांगलीच उडाली आहे.