सिंधुदुर्ग : माघी गणेश जयंती कणकवलीत उत्साहात, भक्तिमय वातावरण, श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:24 PM2018-01-22T16:24:20+5:302018-01-22T16:28:25+5:30
कणकवली येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.
कणकवली : येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.
या माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास श्री गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक एस. एम. हायस्कूल ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत काढण्यात आली.
रात्री ९ वाजता हरकुळ बुद्रुक येथील श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाचे बुवा अभिषेक शिरसाट व नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे यांच्यात डबलबारी भजनांचा सामना झाला. या सामन्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
रविवारी गणेश जयंतीदिवशी सकाळी ७ वाजता श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी १ वाजल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर भजनी मंडळांनी सुश्राव्य भजने सादर केली. रात्री ९ वाजल्यानंतर ओंकार कलामंच सावंतवाडी प्रस्तुत जल्लोष २०१८ हा कार्यक्रम झाला.
हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अण्णा कोदे तसेच त्यांच्या सहकाºयांनी विशेष परिश्रम घेतले.