सिंधुदुर्ग : मालवण किनारी आढळला दुखापतग्रस्त कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:39 PM2018-06-12T16:39:14+5:302018-06-12T16:39:14+5:30
वायरी-भूतनाथ येथे स्मशानभूमी समोरील समुद्र किनाऱ्यावर इंडियन स्कुबा डायव्हर्स अॅण्ड अॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांना जखमी अवस्थेत संरक्षित प्रजाती असलेला आॅलिव्ह रिडले कासव आढळून आला.
सिंधुदुर्ग : वायरी-भूतनाथ येथे स्मशानभूमी समोरील समुद्र किनाऱ्यावर इंडियन स्कुबा डायव्हर्स अॅण्ड अॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांना जखमी अवस्थेत संरक्षित प्रजाती असलेला आॅलिव्ह रिडले कासव आढळून आला.
या समुद्री कासवाच्या उजव्या बाजुचा पुढील पाय तुटलेला होता. तसेच मागील पायांनाही दुखापत झालेली होती. यामुळे या कासवाला पोहोताना त्रास होत होता. जखमी अवस्थेतील हे कासव फाऊंडेशनचे सदस्य भूषण जुवाटकर, प्रशांत तोडणकर, जगदीश तोडणकर यांनी संरक्षित ठिकाणी आणले व त्यांनी वनविभागाला याबाबत कल्पना दिली.
वनविभागाचे कर्मचारी पांचाळ यांनी मालवण येथे दाखल होत जखमी कासवाला इंडियन स्कुबा डायव्हर्स अॅण्ड अॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने कोळंब येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दळवी यांच्याकडे उपचारासाठी आणले. डॉ. दळवी यांनी कासवावर प्राथमिक उपचार केले. जखमी कासवाला पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
पावसाळी कालावधीत किनारपट्टीवर अनेक ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत अथवा जखमी अवस्थेत डॉल्फिन, आॅल्व्हि रिडले यांसारख्या संरक्षित सागरी प्रजाती आढळून येतात. कोणतीही संरक्षित सागरी प्रजाती आढळल्यास लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.