सिंधुदुर्ग : मालवणात ४३ किलो प्लास्टिकमिश्रित पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:50 PM2018-10-15T16:50:54+5:302018-10-15T16:56:05+5:30
मालवण बाजारपेठेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांची तपासणी केली. यात मालवण व कोल्हापूर येथील दोन व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. शहरात प्लास्टिकविरोधी राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
सिंधुदुर्ग : मालवण बाजारपेठेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांची तपासणी केली. यात मालवण व कोल्हापूर येथील दोन व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. शहरात प्लास्टिकविरोधी राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरीच्या उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी शहरातील बाजारपेठ येथे अचानक धडक मोहीम राबविली. प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गिरीश ठाकूर, जयसिंग गावित, रमेश कोकरे यांच्या पथकाने शहरातील सुमारे ३५ ते ४० दुकानांची तपासणी केली असता पाच व्यापाऱ्याकडे नॉन ओव्हनच्या प्लास्टिकमिश्रित पिशव्या सापडून आल्या. यात तीन व्यापाऱ्यांकडे किरकोळ माल सापडून आल्याने तो जप्त करत प्लास्टिक वापर केल्यास कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले.
दहा हजारांचा दंड
प्लास्टिक बंदी विरोधी पथकाने दोन व्यावसायिकाकडे ४३ किलोचे प्लास्टिकमिश्रित पिशव्या जप्त करत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. विजय ट्रेडर्सकडून २१ किलो जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मनीष खुपचंद वाडी (कोल्हापूर) यांच्याकडून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्याच्याकडूनही ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक बंदीवर पालिकेत बैठक
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने अचानक दुकानांची तपासणी मोहीम राबविल्याने काही व्यापाऱ्यांनी मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला. तर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मोहिमेला व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. व्यापाऱ्यांना कोणत्या पिशव्या वापरावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलावणे आवश्यक आहे, अशी भूमिका नेरुरकर यांनी मांडली. पालिकेत लवकरच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाईल, असे मुख्याधिकारी रंजना गगे यांनी स्पष्ट केले.