सिंधुदुर्ग : गतीरोधकावरुन पडून एक ठार, आजपर्यंत दोघांचे गेले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:13 PM2018-03-03T20:13:44+5:302018-03-03T20:13:44+5:30
तोरसे (गोवा) येथून आपल्या सावंतवाडी येथील भावाकडे दुचाकीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी उसळल्याने झालेल्या अपघातात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (२२, रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. जीवघेण्या स्पीडब्रेकरमुळे आतापर्यंत याठिकाणी १० हून अधिक अपघात झाले आहेत.
बांदा : तोरसे (गोवा) येथून आपल्या सावंतवाडी येथील भावाकडे दुचाकीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी उसळल्याने झालेल्या अपघातात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (२२, रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. जीवघेण्या स्पीडब्रेकरमुळे आतापर्यंत याठिकाणी १० हून अधिक अपघात झाले आहेत. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारल्यानंतर शनिवारी हा स्पीडब्रेकर काढून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी राहुलकुमार हा फरशी बसविण्याचे काम करत होता गेले काही दिवस तो तोरसे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी होळीची सुटी असल्याने तो व त्याचा आतेभाऊ यांनी दुपारी होळी साजरी केली. जेवण वगैरे झाल्यानंतर आराम करून रात्री ते गोवा येथील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करण्यासाठी गेले होते.
रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राहुलकुमार हा पुत्तलकुमार मंचन साहनी यांच्या मालकीची दुचाकी (जीए ०८ एल ९०५१) घेऊन सावंतवाडी येथील भावाकडे जाण्यासाठी निघाला. दरम्यान, बांदा कट्टा कॉर्नर सर्कल येथे नव्याने घालण्यात आलेल्या उंच गतिरोधकाचा त्याला अंदाज न आल्याने वेगातच त्याची दुचाकी उडून रस्त्यावर आदळली. त्याबरोबर राहुलकुमारही रस्त्यावर आदळला. अपघात घडल्याचे समजताच येथे उपस्थित स्थानिकांनी त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले.
बिहार येथून हे सेंट्रींग कामगार बांदा परिसरात आले होते. होळी साजरी करून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीसाठी भावाला बोलावण्यासाठी जाणाऱ्या राहुलवर काळाने घाला घातला. ही बातमी त्याच्या भावाला समजताच त्याने तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी त्याने राहुल याच्या मृतदेहाला कवटाळून फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून गेला.
दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी डॉ.पाटील यांनी सांगितले की, मृत राहुल याच्या छातीला मुका मार लागला होता. श्वासनलिकेत रक्त साकळले होते. तोंडाला उजव्या बाजूला व खांद्याला जखम होती. मात्र, कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत डोक्याला किंवा अन्य शरीरावर दिसून आली नाही.
याबाबतचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून रक्तही तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. बांदा पोलीस प्रसाद कदम यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बांदा येथील शिवसेना पदाधिकारी निखिल मयेकर यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारल्यानंतर शनिवारी स्पीडब्रेकर काढण्याचे आश्वासन दिले. हा स्पीडब्रेकर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आल्याचे अभियंता शेडेकर यांनी मान्य केले.
मृत राहुलकुमार सिंह
कट्टा कॉर्नर सर्कल येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात होणारे संभाव्य अपघात टळले आहेत. मात्र, गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर टाकण्यात आलेला गतिरोधक जास्त उंचीचा आहे. त्यामुळे गोव्यातून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही. त्यामुळेच याठिकाणी अपघात सातत्याने होत आहेत. आलिशान गाड्यांंची या गतिरोधकामुळे मोठे नुकसान होत आहे. दोनच दिवसांपूर्वी एक गाडीची दर्शनी व मागची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी असणाऱ्या गतिरोधकाची उंची कमी करून योग्य त्या उंचीचा गतिरोधक बसवावा अशी मागणी करण्यात येत आहे.