सिंधुदुर्ग : निशिगंधा कुबल ठरल्या महापैठणीच्या विजेत्या, आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्याना मानाची पैठणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:23 PM2018-02-24T17:23:18+5:302018-02-24T17:23:18+5:30
शिवसेना नेते तथा होम मिनिस्टर फेम सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो महिला विद्यामंदिरच्या पटांगणावर उपस्थित होत्या.
कणकवली : शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने खेळ मांडियेला... महापैठणीचा हा कार्यक्रम येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांची उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या या खेळात निशिगंधा कुबल महापैठणीच्या विजेत्या ठरल्या. तर कलमठ सरपंच देविका दीपक गुरव उपविजेत्या ठरल्या आहेत. तसेच परिणिता गुरव यांना तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी मिळविण्यात यश मिळाले आहे.
शिवसेना नेते तथा होम मिनिस्टर फेम सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो महिला विद्यामंदिरच्या पटांगणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित स्पर्धकांमधून आदेश बांदेकर यांनी चिठ्ठीद्वारे स्पर्धकांची निवड केली. त्यानंतर आदेश बांदेकर यांच्यासोबत पैठणीचा खेळ खेळण्यात महिला दंग झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच कोण ठरणार महापैठणीची मानकरी याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आणि ही उत्कंठता आणखीनच वाढली. दीपिका गुरव, परिणिता कोठावळे, निशिगंधा कुबल यांच्यात महापैठणीसाठी चुरस निर्माण झाली होती.
मात्र, शेवटी या खेळात बाजी मारत निशिगंधा कुबल महापैठणीच्या विजेत्या ठरल्या. यावेळी प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच भाग्यवान विजेत्यांना चांदीच्या नाण्यासह अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, नंदिनी धुमाळे, स्नेहा तेंडोलकर, जान्हवी सावंत , शेखर राणे, प्रमोद मसुरकर, वैभवी पाटकर, संजीवनी पवार, आदी उपस्थित होते.
आदेश बांदेकरांच्या किश्श्यांनी हास्याचे फवारे
खेळादरम्यान आदेश बांदेकर यांनी विविध किस्से सांगत उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे फुलविले. त्यामुळे बुधवारची संध्याकाळ कणकवलीवासीय महिलांसाठी यादगार ठरली. या महापैठणीच्या खेळादरम्यान आदेश बांदेकर यांनी स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या महिलांसाठीही विविध खेळ घेतले. यावेळी सादर झालेल्या विविध गाण्यांवर महिलांनी नृत्याचा ठेका धरला.
तरुणींसह वृद्ध महिलांनी फुगडीसह आपले वैशिष्टयपूर्ण नृत्यकौशल्य दाखविले. चांदणं चांदण झाली रात, वाट माझी बघतोय रिक्षावाला, पहिल्या धारेच्या प्रेमाने साला आदी गाण्यांच्या बोलावर युवाईसह सत्तरीतील आजीही थिरकल्या. त्यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.