सिंधुदुर्ग : मराठा समाज निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना घरी बसविणार : सुरेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:23 PM2018-09-17T14:23:31+5:302018-09-17T14:26:25+5:30
आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मराठा समाज घरी बसविणार असल्याची माहिती मराठा क्रान्ति मोर्चा समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली़.
कणकवली : गेल्या २०-२५ वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या मराठा समाजातील नेत्यांनी अद्यापही समाजाला आरक्षण मिळवून दिलेले नाही. २०१६ मध्ये मराठा क्रांती मुक मोर्चातून आपल्या भावना समाजाने सरकार दरबारी पोहोचविल्या़ तरी देखील समाजाला आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईतील राज्यव्यापी समन्वय बैठकीत मराठा समाजाचा पक्ष काढण्याचा निर्णय झाला आहे.
या पक्षाची घोषणा रायरेश्वर मंदिरातून दसऱ्याच्या मुहुर्तावर करण्यात येईल़. त्यानंतर होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मराठा समाज घरी बसविणार असल्याची माहिती मराठा क्रान्ति मोर्चा समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली़.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस़ टी़ सावंत, लवू वारंग, युवा उद्योजक गोपाळ दळवी, योगेश सावंत, भरत पाटील, कोल्हापूर कार्याध्यक्ष संतोष कांदेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर, युवा जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर, परेश भोसले आदींसह मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले, कोल्हापूर येथे १ हजार मराठा कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापनेसाठी अनुमोदन दिले आहे. जोपर्यंत या सत्ताधाऱ्यांना आणि पहिल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून बाजूला ठेवून मराठा समाज सत्तेवर येत नाही. तोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. मराठा समाजातील नेते गेले २५ वर्षे सत्तेत राहून समाजावर राजकारण करत आहेत.
त्या प्रस्थापितांना हरविण्यासाठी आमचा पक्ष काम करेल़. कोकणात काही नेत्यांनी नेतृत्व केले़ पण कोकणचा विकास झाला का? मुळ पायाभूत सुविधा आल्या आहेत का? कोकणचे कॅलीफोर्निया करण्याचे काम मराठा समाजाचा पक्ष करेल. त्या पक्षाच्या पाठीशी जिल्हा वासियांनी राहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मराठा समाज पक्ष काढत असल्याचे समजल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी नाहक सोशल मिडीयावर बदनामी सुरू केली आहे़ . या बदनामीला मर्द मराठा घाबरणार नाही. आता लढाई आरपारची होईल़ मराठा समाज पक्षाच्या उमेदवारांमध्ये ५० टक्के महिलांना संधी असेल.
युवक-युवतींना प्राधान्य दिले जाईल़ शिक्षण, आरोग्य, संरक्षण, उद्योग, शेती, रोजगार क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांना सोबत घेऊन हा पक्ष काम करेल. या पक्षाला कोणीही अध्यक्ष असणार नाही. पक्षाचा उमेदवारीचा निर्णय १०० समन्वयकांच्या उपस्थितीत होईल़ मुख्य समन्वयक व जिल्ह्यामध्ये उपसमन्वयक काम करतील़ प्रस्थापितांना धक्का देऊन काम करणारा हा पक्ष असणार आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्वही जागा मराठा समाजाचा पक्ष लढेल़ . तज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनियरर्स, वकील, माजी सनदी अधिकारी यांच्या कोअर कमिटीच्या मार्गदर्शनानुसार पक्षाची वाटचाल राहील़ मुस्लिम, लिंगायत, धनगर समाज सोबत घेऊन मराठा समाजाचा पक्ष तिसरी आघाडी तयार करेल़ मराठा पक्ष आल्यानंतर आपली दुकाने बंद होणार या भितीपोटी सत्ताधारी आणि विरोधकांचा बदनामी करण्याचा खटाटोप सुरू आहे़ जनतेने या टिकाकारांकडे दुर्लक्ष करावे़ आम्ही प्रस्थापितांसमोर सक्षम पर्याय देऊ, असा विश्वास सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.