सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय येत्या वर्षापासून सुरू; ९६६ कोटींचा खर्च शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:12 AM2020-12-10T11:12:46+5:302020-12-10T11:15:36+5:30
Hospital, Sindhudurg, Kolhapur सिंधुदुर्ग येथे होणारे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) सुरू करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : सिंधुदुर्ग येथे होणारे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) सुरू करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.
महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्यासाठी आगामी चार वर्षांसाठी ९६६ कोटी रुपये खर्च येऊ शकेल असा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. त्यासंबंधीचा शासन आदेशही सरकारने मंगळवारी (दि. ८) काढला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी आगामी आर्थिक वर्षामध्ये या निधीसाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करून घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा तुलनेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात मागासलेला आहे. त्यामुळे तिथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यास २४ नोव्हेंबर २०२० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनाप्रमाणे जिल्हा रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान २० एकर जागेसह) कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास नि:शुल्क वापरास हस्तांतरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे.
खर्चाचा तपशील कोटींमध्ये असा
१. इमारत व बांधकाम : ५७२.००
२. महाविद्यालयीन अधिकारी व कर्मचारी : ११८.५५
३. रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी : १०९.१९
४. यंत्रसामग्री व उपकरणे : १२० कोटी
५. आवर्ती खर्च : ३१.०३
६. बाह्यस्रोत खर्च : १५.३१
वर्षनिहाय अशी लागेल रक्कम
प्रथम वर्ष (२०२१-२२) - ३६६.५८
द्वितीय वर्ष - १९३.७४
तृतीय वर्ष - २१५.३५
चतुर्थ वर्ष - १९०.४१
महाविद्यालयासाठी आवश्यक पदे
वर्ग १ : ५०
वर्ग २ : ५१
विद्यावेतनाची पदे : ११८
वर्ग ३ नियमित पदे : १८६
वर्ग ३ बाह्यस्रोताची पदे : ५८
वर्ग४ (कंत्राटी) : ६१
एकूण पदे : ५२४ व त्यांवरील खर्च : ११८ कोटी ५५ लाख
रुग्णालयासाठी आवश्यक पदे
वर्ग१ : ०३
वर्ग २ : १७
वर्ग ३ नियमित पदे : ५४४
वर्ग ३ बाह्यस्रोताने : ४५
वर्ग ४ (कंत्राटी) : ४७७
एकूण पदे : १०८६ व पगारावरील खर्च : १०९ कोटी १९ लाख