सिंधुदुर्ग : सभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:36 PM2018-05-30T16:36:33+5:302018-05-30T16:36:33+5:30
तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.
दोडामार्ग : तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.
तेरवण-मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामघाट धनगरवाडी येते. याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य ती सुविधा नाही. त्यामुळे एका डबक्यातील पाण्याचा आधार पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो. परिणामी या पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तेरवण-मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांनीदेखील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
मात्र, पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रामघाट धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात येथील डबक्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी गढूळ बनले आहे. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरीत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिणामी झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत चक्क गढूळ पाणी बाटलीत भरून सभापती नाईक यांना भेट दिले. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती गणपत नाईक, तहसीलदार रोहिणी रजपूत व पंचायत समितीचे अधिकारी तातडीने तेरवण-मेढेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी ग्रामस्थ महेश काळे, बबन जंगले आदी उपस्थित होते.
तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का?
पाणीटंचाईकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गढूळ पाणी सभापती गणपत नाईक यांना देऊन संताप व्यक्त केला. हे गढूळ पाणी पिऊन ग्रामस्थ तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.