सिंधुदुर्ग : बांदा नट वाचनालयात अवतरला कालिदासाचा मेघदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:57 PM2018-08-02T13:57:10+5:302018-08-02T14:01:03+5:30
बांदा येथील नट वाचनालयात स्वरचित काव्यवाचन संमेलनाला काव्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने वाचनालयात कालिदासाचा मेघदूत अवतरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित होते.
बांदा : बांदा येथील नट वाचनालयात स्वरचित काव्यवाचन संमेलनाला काव्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने वाचनालयात कालिदासाचा मेघदूत अवतरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, कविवर्य भास्कर पावसकर, मळगाव वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह महेश खानोलकर उपस्थित होते.
या संमेलनात नवोदित कवींनी स्वरचित पावसाळी कविता वाचून व गाऊन दाखविल्या. विमल गवस यांच्या पावसात थोडे भिजून घ्या या कवितेने कवी संमेलनाची सुरुवात केली. प्रसिद्ध कवी रामचंद्र शिरोडकर यांनी पावसपाणी पडान जावने ही कविता गाऊन दाखवली. सचला आरोलकर यांनी आषाढस्य प्रथम दिवसे हे कालिदासांचे महाकाव्य आणि मेघदूतबद्दल सविस्तर माहिती दिली व आपली स्वरचित पाऊस ही कविता सादर केली.
त्यानंतर शुभेच्छा सावंत यांनी पाऊस आला रे आला, निशांत नाईक यांनी उन्हाळो संपान पावस ईलो, गणेश गर्दे यांनी चिंब भिजल्या पावसाने आणि या हो या हो पाऊस राया या कविता सादर केल्या.
जय भोसले यांनी ओल्या मातीचो वास ही मालवणी कविता सादर केली. अनंत भाटे यांनी पावसाळ्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर पाऊस धडाडला पाऊस कडाडला ही कविता सादर केली.
जे. डी. पाटील यांनी पावसाचे थेंब तर विमल तारी यांनी जमिनीला आली जाग ही कविता सादर केली. अर्चना सावंत यांनी पावस इलो पावस इलो, डॉ. आशा रेगे यांनी पावसावर तर आशुतोष भांगले यांनी कवी मडकईकरांवर चारोळी सादर केली.
यावेळी सरिता मडकईकर, संचालक जगन्नाथ सातोस्कर, सुधीर साटेलकर, स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, उज्ज्वला नार्वेकर, बच्चू कनयाळकर, सचिन चांदेकर, अमिता मुंगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह राकेश केसरकर यांनी, आभार सहकार्यवाह हेमंत मोर्ये यांनी मानले. या कवी संमेलनाला काव्य रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
विनोदी शैलीने रसिकांची मने जिंकली
कवी दादा मडकईकर यांनी तू पावस मी पावस या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सुक्या मनार पानापानार, मिरग, सासयेची माया, तारया मामा तारया मामा होडी हाड रे, चांदण्याची फुला, शालग्या जाळवानदारीण अशा अनेक कविता आपल्या विनोदी शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी हार्मोनियम गौरांग भांगले व आशुतोष भांगले तर तबला साथ संगत राजू परब यांनी केली.
यावेळी कवी भास्कर पावसकर यांनी कालिदासाच्या मेघदूताचे वर्णन करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले आणि आपली पहिला पाऊस ही कविता सादर केली. या कार्यक्रमात दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या रोशन मोरजकर याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.