सिंधुदुर्ग : दिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या जादा गाड्या, २ नोव्हेंबरपासून मार्गावर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:45 PM2018-10-23T15:45:41+5:302018-10-23T15:47:36+5:30
कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यानुसार ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे.
सिंधुदुर्ग : दिवाळीसाठीकोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. २ नोव्हेंबरपासून या गाड्या या मार्गावरून धावणार आहेत. तर दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यानुसार ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे.
ही गाडी रात्री १ वाजून १० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास त्याच दिवशी म्हणजे ५, १२ व १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीहून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी तो लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबे घेत सावंतवाडीला विसावणार आहे.
दुसरी विशेष गाडी लोकमान्य टर्मिनस ते थिवी (०१०४५/०१०४६) मार्गावर २, ९ व १६ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी २२ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. वातानुकूलित, स्लीपर तसेच सर्वसाधारण श्रेणीचे डबे या गाडीला जोडण्यात येणार आहेत.
ही गाडी लोकमान्य टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता ती गोव्यात थिवी स्थानकावर पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास थिवी स्थानकावरून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी तो मुंबईत लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
प्रवाशांत समाधान
या विशेष गाड्यांमुळे दिवाळीच्या कालावधीत कोकणात येणाऱ्या मुंबईकर मंडळींची सोय होणार आहे. प्रवासाच्या दृष्टीने त्यांना या गाड्या सोईस्कर ठरणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.