सिंधुदुर्ग : मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्गच्या विकासाची नांदी, कामाला युद्धपातळीवर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:16 AM2019-01-02T11:16:55+5:302019-01-02T11:19:00+5:30

शिवकालीन पारगड किल्ला ते दोडामार्ग यांना जोडणारा मोेर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचा महामेरू ठरणार आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्ची घालून या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या बांधणीमुळे घाटमाथ्यावरील प्रदेश आणि गोवा राज्य जवळ येणार आहे. एकंदरीत मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषीक्रांतीसाठी विकासाची नांदी ठरणार आहे.

Sindhudurg: Morley-Paragad Road Begins on Doda Marg Development | सिंधुदुर्ग : मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्गच्या विकासाची नांदी, कामाला युद्धपातळीवर सुरुवात

मोर्ले-पारगड रस्त्याचे मातीकाम वेगात सुरू आहे.

ठळक मुद्देमोर्ले-पारगड रस्ता दोडामार्गच्या विकासाची नांदीदहा कोटी रुपये खर्च : कामाला युद्धपातळीवर सुरुवात

वैभव साळकर
 
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : शिवकालीन पारगड किल्ला ते दोडामार्ग यांना जोडणारा मोेर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचा महामेरू ठरणार आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्ची घालून या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या बांधणीमुळे घाटमाथ्यावरील प्रदेश आणि गोवा राज्य जवळ येणार आहे. एकंदरीत मोर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषीक्रांतीसाठी विकासाची नांदी ठरणार आहे.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर दोडामार्ग तालुका वसला आहे. या तिन्ही राज्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम दोडामार्ग तालुका करतो. मात्र, असे असले तरी वाहतूक व दळणवळणाच्या सोयी सुविधांअभावी केंद्रस्थान असूनदेखील तालुक्याची औद्योगिक अथवा शेतीविषयक परिस्थिती सुधारलेलीे नाही. मात्र, सद्यस्थितीत तालुक्याची औद्योगिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे मोर्ले-पारगड या महत्त्वाकांक्षी रस्त्यावरून दिसू लागली आहेत.


सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यातून हा रस्ता काढला जात आहे.

पर्यटनस्थळांच्या विकासाला मिळणार गती

मोर्ले-पारगड या महत्त्वाकांक्षी रस्त्यामुळे चंदगड तालुक्याबरोबरच दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासालाही गती मिळणार आहे. पारगड येथील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारा पर्यटक आपसूकच दोडामार्ग तालुक्यात येणार असून त्यामुळे येथील तेरवण-मेढेमधील नागनाथ मंदिर, तिलारी धरण, मांगेलीचे वर्षा पर्यटन, कसईनाथ डोंगर आदी पर्यटनस्थळांचा विकास साधण्यास मदत होणार आहे.

औद्योगिक, कृषीक्षेत्राच्या प्रगतीची नांदी

मोर्ले-पारगड रस्त्यामुळे गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येणार आहेत. याशिवाय सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे औद्योगिकरणाबरोबरच कृषीक्षेत्रातून उत्पादित होणारा माल गोव्यात आणण्यासाठी या मार्गाचा निश्चितच वापर होईल. परिणामी त्याचा फायदा दोडामार्ग तालुक्याला होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिकक्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे मोर्ले-पारगड रस्ता औद्योगिक व कृषीक्रांतीची नांदी ठरेल.

Web Title: Sindhudurg: Morley-Paragad Road Begins on Doda Marg Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.