सिंधुदुर्ग : देशातील माल वाहतूक २० जुलैला बंद, प्रकाश गवळी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:41 PM2018-07-03T16:41:46+5:302018-07-03T16:44:02+5:30
गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आमच्या रास्त आणि न्याय्य मागण्यांपैकी एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी ६ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असून, यावेळी देशातील मालवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कमिटी मेंबर व महाराष्ट्र राज्य ट्रक, बस, मोटार वाहतूक महासंघाचे राज्यअध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग : गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आमच्या रास्त आणि न्याय्य मागण्यांपैकी एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी ६ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असून, यावेळी देशातील मालवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कमिटी मेंबर व महाराष्ट्र राज्य ट्रक, बस, मोटार वाहतूक महासंघाचे राज्यअध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा मोटार वाहतूक मालक-चालक संघटना यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गवळी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश केसरकर, राजेंद्र्र तार्इंगडे, शिवाजी घोगळे, गिरीधर रावराणे, राजन बोभाटे, बावतीस फर्नांडिस, शरद वालावलकर, मनोज वालावलकर, रामदास पडते, शेखर मुणगेकर, रघुराज वाटवे, विवेकानंद केरकर, पांडुरंग कांदळगावकर, विजय वालावलकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गवळी म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात कोणत्याच मागण्यांचा विचार केला नसून माहितीही दिली नाही. सातत्याने मागणी करूनसुद्धा पूर्तता होत नसल्याने एआयएमटीसीच्या २०५ व्या व्यवस्थापन समिती बैठकीनुसार २० जुलैपासून राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय आल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारच्या जुलमी आणि दबावजन्य वाहतूक विरोधी धोरणांमुळे मूलभूत प्रश्न आणि समस्या सोडविणे तर दूरच, पण या सर्व क्षेत्राला झुलवत ठेवले असून, या सर्व प्रकारांमुळे हा उद्योग संपण्याच्या मार्गावर आला आहे. हा व्यवसाय वाचवायचा असेल, तर काही महत्त्वाच्या बाबींवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यामध्ये असहनीय झालेली डिझेल दरवाढ कमी करावी, वर्षभराचा टोल एकदाच घ्यावा, त्यामुळे डिझेल व वेळेचे होणारे नुकसान वाचेल, वाहतूक व्यवसायाला टीडीएस आकारणी करू नये, १८ टक्के जीएसटी कमी करावा, अशा व इतर मागण्या आमच्या आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू राहील, असेही गवळी यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तू वाहतुकीस विरोध नाही
संपकाळात जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला आम्ही विरोध करीत नाही. तरीही भाजीपाला तसेच इतर वस्तूंचा दर वाढविला जातो, असे सांगत आता वेळ पडल्यास ही वाहतूकही आम्ही बंद करणार आहोत, असे गवळी यांनी सांगितले.राज्यातील महामार्ग पोलीस विभागासह तालुका, शहर, ग्रामीण, अवैध वाहतूक विरोधी पथक या सर्व विभागांचे पोलीस वाहतूकदारांना अडवून त्यांची लूट करतात, असा आरोप गवळी यांनी पोलीस प्रशासनावर केला.