सिंधुदुर्ग : माझ्या यशात आई वडिलांचा त्याग आणि कष्ट : पूनम राऊतचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:46 PM2018-08-30T12:46:13+5:302018-08-30T12:56:35+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता. कणकवली) येथील असलेली पूनम इंडियन रेल्वेकडून खेळत असून रेल्वेमध्येच ती कार्यरत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी पूनमची निवड झाली असून ती सध्या कसून सराव करीत आहे.
निकेत पावसकर
तळेरे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता. कणकवली) येथील असलेली पूनम राऊत इंडियन रेल्वेकडून खेळत असून रेल्वेमध्येच ती कार्यरत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी पूनमची निवड झाली असून ती सध्या कसून सराव करीत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते देशाची आघाडीची फलंदाज असा पूनमचा प्रवास झाला कसा हे जाणून घेण्याचा प्रयत्न जागतिक क्रीडा दिना निमित्त केला.
मुंबईच्या गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळत देशाच्या महिला क्रिकेट संघात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी स्थान मिळविणारी भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज पूनम राऊत हिला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल उंच माझा झोका हा पुरस्कार सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात आले. इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत देशाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना तिने चमकदार कामगिरीने सर्वांचे महिला क्रिकेटकडे लक्ष वेधले.
यावेळी पूनम म्हणाली, प्रत्येक मुलीमध्ये एक वेगळे कौशल्य दडलेले असते. मुळातच मुली लाजऱ्या-बुजऱ्या असल्याने त्या आपल्या मनातील विचार पालकांसमोर व्यक्त करीत नाहीत. प्रत्येक मुलीने आपल्या पालकांबरोबर मनमोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे.
आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी हट्ट धरायला काही हरकत नाही. काही मुली आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत जीवन जगतात. त्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. काही पालकही मुलगा-मुलगी भेद करून प्रत्येक ठिकाणी फक्त मुलांनाच संधी देतात आणि परक्याचे धन म्हणून मुलींना सोईस्कर डावलतात असाही प्रकार घडत असल्याने क्रिकेटमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे.
क्रिकेट याच खेळाकडे कशी वळलीस? असे विचारताच ती म्हणाली, माझे तिसरीपर्यंतचे शिक्षण प्रभादेवीला झाले तर चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण एक्सेल सुविद्यालय बोरिवली येथे झाले. ९ वर्षांची असताना मी मुलांसोबत मुंबईच्या गल्लीत क्रिकेट खेळायचे.
ते बाबांनी पाहिले. जवळजवळ एक वर्षभर माझा खेळ बाबा पहात होते. मुलांच्या तोडीस तोड खेळ करीत असल्याचे बाबांच्या लक्षात आले. त्यावेळी अशी परिस्थिती होती की, संघात दहा मुलगे आणि मी एकटीच मुलगी खेळायला असायचे.
माझ्यातील फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, धावा काढण्याची वेगळी शैली ही बाबांसारखीच असल्याने एके दिवशी बाबांनी विचारले, पूनम, तू सिझन क्रिकेट खेळशील का? त्याचवेळी सिझन क्रिकेट खेळताना करावी लागणारी मेहनत व इतर अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. पण मुळातच खेळाडू वृत्ती असल्याने मी बाबांच्या मागे लागले. त्यानंतर मला बोरिवली स्पोर्टस् क्लबमध्ये दीड महिन्याच्या समर कॅम्पला ठेवले. त्यावेळीही तिथे संघात दहा मुलगे तर मी एकटीच मुलगी खेळत असे.
प्रत्येकवेळी माझा खेळ उत्कृष्ट होत असे. त्यामुळे मुलांच्या संघात पूनम एकटीच मुलगी आहे, असे त्यावेळी अनेक पालक बोलून दाखवायचे. ही मुलगी नसती तर माझ्या मुलाला संधी मिळाली असती. ती मुलांमध्ये का खेळते? मुलींच्या संघात तिने खेळावे. हे ऐकून बाबा प्रशिक्षक गायतोंडे यांच्याकडे गेले आणि पूनमला येथून काढून मुलींच्या क्लबमध्ये टाकतो असे सांगितले. मात्र, त्यावेळी गायतोंडे म्हणाले की, ती इथेच खेळेल. कोण काही बोलत असेल तर त्यांना मला भेटायला सांगा. त्यानंतर माटुंगा येथे मुंबई संघाची निवड होती.
तिचे वडील म्हणाले, १४ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील दोन्हीही संघात पूनमची निवड झाली. ते सामने दिल्ली आणि प्रवरानगर येथे झाले. तिथे तिने चांगल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ती २००६-०७ च्या भारतीय संघाच्या प्रोबेबलमध्ये निवड व्हायची. त्यावेळीही मला वाटायचे की पूनम विश्वचषक केव्हा खेळणार? तिला सातत्याने मीही विचारायचो की, बेटा तू विश्वचषक केव्हा खेळणार? अशा परिस्थितीतही पूनमच मला धीर द्यायची.
ती म्हणायची, बाबा मी नक्की विश्वचषक खेळणार, मी प्रयत्नही करतेय आणि त्यानंतर २००९ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात तिची निवड झाली. भारतीय संघात निवड झाल्याने क्रिकेटचे स्वप्न पूर्ण होतेय असे वाटू लागले. सलामीवीर फलंदाजी करताना पूनम आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर देते.
३२० धावांचा विश्वविक्रम
मे २०१७ मध्ये आयर्लंड विरूद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्मा व मराठमोळी मुलगी पूनम राऊतने ३२० धावांची दमदार सलामी दिली. एकदिवशीय सामन्यातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. यामध्ये पूनमने १०९ धावा काढत विश्वविक्रम प्रस्थापित केला. महिला क्रिकेट संघाच्या या खेळाडूंनी देशाचा झेंडा पुन्हा अटकेपार नेला. त्या सामन्यात भारतीय संघाचा २४९ धावांनी दणदणीत विजय झाला.
वडिलांनी तिच्या जिद्दीला केला सलाम
घरगुती तसेच इतर कारणांमुळे मध्यंतरी दीड-दोन वर्षे पूनम खेळायची बंद झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वादळी खेळीने अनेकांना दखल घ्यायला लावणाऱ्या पूनमचा खेळ अचानक बंद झाला. पुन्हा ती पुनरागमन करेल व पूर्वीसारखीच खेळेल असे घरच्यांना वाटत नव्हते. मात्र, मुळातच वडिलांकडून खेळाडू वृत्ती घेतलेल्या पूनमला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याने तिने दमदार पुनरागमन केले. देशाच्या संघात आपले स्थान पुन्हा मिळविले.
महिला विश्वचषकासाठी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाकडून खेळताना महाराष्ट्राची आणि सिंधुदुर्गवासीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी तिने केली. या पुनरागमनाला तिच्या वडिलांनीही सलाम केला.
मुलींसाठी मोफत पूनम राऊत क्रिकेट अकादमी
कोणताही खेळ जबरदस्तीने खेळण्याऐवजी आनंदाने खेळा. खेळताना खेळाचा आनंद लुटा, तरच त्या खेळात यश प्राप्त होते असेही तिने मत स्पष्ट केले. क्रिकेटकडे अमाप प्रसिद्धी व बऱ्यापैकी पैसा मिळवून देणारा खेळ म्हणून पाहिले जावू लागल्याने कोचिंगच्या नावाखाली काही लोकांनी अक्षरश: क्रिकेटचा बाजार मांडला असल्याची खंत पूनमने व्यक्त केली. क्रिकेट या क्षेत्राकडे विशेष करून मुलींनी वळावे म्हणून मुंबईत गेल्या वर्षापासून पूनम राऊत क्रिकेट अकादमी या नावाने मोफत क्रिकेट अकादमी सुरू केली असल्याची तिने यावेळी माहिती दिली.
पूनमचे आवाहन
पूनमची घरची परिस्थिती बेताचीच. वडील चालक म्हणून काम करतात. तिच्यातील उपजत खेळ पुढे न्यावा यासाठी वडिलांनी पूनमला मोठा पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले. तिच्या या प्रवासात तिच्या आई वडिलांप्रमाणेच तिचे प्रशिक्षक यांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे ती सांगते.
माझ्या पालकांनी माझ्यासाठी केलेला त्याग व घेतलेल्या अपार कष्टामुळेच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू म्हणून घडू शकले असे सांगतानाच तुम्हांला जर एखाद्या क्षेत्रात उच्च शिखरापर्यंत पोहोचायचे असेल तर मेहनतीला कधीच तडजोड करू नका, यश आपोआप पायाशी लोळण घेईल. त्यासोबतच शॉर्टकट यशापासून दूर रहा, असा सल्लाही तिने खेळाडूंना दिला.