सिंधुदुर्गनगरी : कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ
By admin | Published: October 2, 2014 10:14 PM2014-10-02T22:14:06+5:302014-10-02T22:24:32+5:30
जिल्हा परिषद : महिला बालविकास अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी : परिसराची स्वच्छता करताना प्रत्येकाने आपल्या मनाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता करतानाच प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून स्वच्छता करण्यास सुरूवात केल्यास स्वच्छ भारत संकल्पना दूर नाही, असे प्रतिपादन महिला बालविकास अधिकारी ज्ञानदेव रसाळ यांनी केले.
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जयंती कार्यक्रम तसेच स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. रेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये, पशुसंवर्धन अधिकारी चंदेल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने तसेच प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आली.
यावेळी रसाळ म्हणाले, कुठलाही कार्यक्रम हाती घेताना अंतर्मुख होऊन काम करणे गरजेचे असते. त्यामुळे तो कार्यक्रम पूर्णत: यशस्वी होतो. शासनाच्या निर्णयाप्रमाणे स्वच्छतेची सवय लागावी यासाठी स्वच्छता शपथ कार्यक्रम जिल्ह्यात सर्वत्र घेण्यात येत आहे. मात्र, सर्वांनी या कार्यक्रमाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे, असेही रसाळ म्हणाले.
ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरून ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होत आहे. या प्रकल्पाची सुरूवात प्रभावीपणे होण्यासाठी केंद्र सरकारने २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या कालावधीमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी निर्देशित केले आहेत. मागील १० वर्षाचा अनुभव पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेकडून स्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभाग मिळविण्यासाठी विविध स्तरावर जनसंवाद उपक्रम राबविण्याबरोबरच आंतरव्यक्ती संवाद उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी निर्मल भारत अभियान कक्षातील जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचारी दररोज किमान ५ गृहभेटी करून या कार्यक्रमाची जनजागृती करून या अभियान कालावधीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शौचालय बांधकाम व वापर, शाळांमध्ये पर्याप्त प्रमाणात मुला- मुलींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धी, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा करणे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनानेही स्वच्छतेची शपथ घेतली. (प्रतिनिधी)