सिंधुदुर्गनगरी : गतिरोधकाच्या सळ्या धोकादायक, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:13 PM2018-07-12T14:13:35+5:302018-07-12T14:18:31+5:30
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे फाटकानजीक रेल्वेने घातलेल्या गतिरोधकाच्या सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. त्यामुळे तळेरेकडे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला असून सळ्या टायरमध्ये घुसून रात्रीच्या वेळी भीषण दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे फाटकानजीक रेल्वेने घातलेल्या गतिरोधकाच्या सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. त्यामुळे तळेरेकडे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला असून सळ्या टायरमध्ये घुसून रात्रीच्या वेळी भीषण दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु गतिरोधकाच्या बाजूलाच रेल्वेची केबीन असूनही गतिरोधकाच्या परिस्थितीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेल्वे फाटकामुळे वाहनचालक व प्रवासी पुरते त्रस्त झालेले आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर फाटकाच्या दुतर्फा रेल्वेमार्फत सिमेंटचे स्लीपर टाकून मोठे गतिरोधक तयार करण्यात आले आहेत.
या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने अलिशान कार व तत्सम चारचाकी छोट्या वाहनांचे गतिरोधकाशी घर्षण होऊन आर्थिक नुकसान होत आहे. तर गतिरोधकाच्या उंचीमुळे काही वाहनांना अपघात होऊन रेल्वेचे फाटक तुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
रिक्षा, दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना गतिरोधकाच्या टोकदार सळ्यांचा सर्वाधिक धोका आहे. रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
भीषण अपघाताची भीती
वैभववाडीकडील गतिरोधकाचे काही स्लीपर वाहनांच्या दणक्याने उखडून त्यांची झीज झाल्यामुळे सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. सतत बंद होणाऱ्या फाटकावर वाहनचालकांचे लक्ष असल्याने ही उघडी पडलेली गतिरोधकावरील सळ्यांची टोके सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या टायरमध्ये सळ्या घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फाटक उघडे असताना या गतिरोधकावर वाहनांचा वेग किंचित कमी होत असला तरी फाटक पार करुन जाण्याची घाई असते. रात्रीच्यावेळी या सळ्या दिसत नाहीत. त्यामुळे घाईगडबडीत फाटक पार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहनांना उघड्या पडलेल्या सळ्या टायरमध्ये घुसून भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.