सिंधुदुर्गनगरी : प्रकाश मांजरेकरला दोन वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:47 PM2018-04-03T18:47:06+5:302018-04-03T18:47:06+5:30
एका विवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा घोगळवाडी येथील प्रकाश सोनू मांजरेकर (४३) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सिंधुदुर्गनगरी : एका विवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा घोगळवाडी येथील प्रकाश सोनू मांजरेकर (४३) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.
विवाहिता ७ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी १२.३० ते १ या वेळेत घरातील चुलीवर जेवण करीत असताना मद्यपान करून आरोपी प्रकाश मांजरेकर तेथे आला. यावेळी त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल ओतले. हे रॉकेल चुलीमध्ये पडले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. यात ती विवाहिता गंभीर भाजली होती.
विवाहितेच्या तक्रारीनुसार मांजरेकर यांच्यावर भा.द. वी. कलम ३०७ नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश तिडके यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.
न्यायालयाने एकूण ११ साक्षीदार तपासले. यात तक्रारदार त्याची मुलगी तथा प्रत्यक्ष साक्षीदार व तपासीक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. तोरसकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने मांजरेकर याला दोषी ठरविले आहे.