सिंधुदुर्ग : नाणार प्रकल्प उभा रहावा : बबन साळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:29 PM2019-01-04T13:29:26+5:302019-01-04T13:31:09+5:30
ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण नाही. हे पानीपत येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांमुळे समोर आले आहे. त्यामुळे नाणार येथे होणारा हा प्रकल्प उभा रहावा, या मताचा मी असून पानीपत येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प पाहण्याची माझी इच्छा आहे, असे स्पष्ट मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण नाही. हे पानीपत येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांमुळे समोर आले आहे. त्यामुळे नाणार येथे होणारा हा प्रकल्प उभा रहावा, या मताचा मी असून पानीपत येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प पाहण्याची माझी इच्छा आहे, असे स्पष्ट मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष साळगावकर यांनी सावंतवाडी पालिकेमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर उपस्थित होत्या. यावेळी साळगावकर म्हणाले, या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होणे काळाची गरज आहे.
प्रकल्प एकाने आणायचा व दुसऱ्याने त्याला विरोध करायचा ही राजकीय प्रवृत्ती चुकीची आहे. इतर देशातील टॅलेंट याठिकाणी वापरले असते तर आज कोकण विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर दिसले असते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. मात्र आत्तापर्यंतच्या एकाही राजकीय नेत्याला येथील एकही बंदर विकसित करता आले नाही हे आपले दुर्दैव आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आपण या ठिकाणावरून घालवतो हे सर्वात मोठे दुर्दैव असून नाणारसारखा प्रकल्प यशस्वी होणे गरजेचे आहे. काही लोकांनी पत्रकारांसहित पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाची पाहणी केली. तेथील लोकांकडून या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यातून ग्रीन रिफायनरी मधून निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही हे समोर आले.
विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. सीवर्ल्ड, गोल्फ क्लब सारखे प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. येथील युवक-युवतींना रोजगार मिळावा आईवडीलांच्या म्हातारपणात तेच त्यांच्या जीवनाची काठी बनावेत हा त्या मागचा उद्देश आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.
विकास परिषद बोलावणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने कोणता मोठा प्रकल्प नाही. आज अनेक तरुण बेरोजगार आहेत. या ठिकाणी आलेल्या प्रकल्पाला विरोध होतो यामागचे नेमके कारण काय या संदर्भात सगळ्याच राजकीय लोकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण लवकरच विकास परिषद आयोजित करणार असल्याचे साळगावकर म्हणाले.