सिंधुुदुर्ग : नाबर प्रशालेत संपूर्ण कारभार महिलांच्या हाती, विभागप्रमुखांपासून शिपायांपर्यंत महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:04 PM2018-03-08T17:04:41+5:302018-03-08T17:04:41+5:30
बांदा (सिंधुुदुर्ग) येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या शिक्षिका बांदा येथील अग्रणी असलेल्या या शाळेचा संपूर्ण कारभार हा महिलाच सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांपासून ते थेट शिपायांपर्यंत या प्रशालेत महिलाराज आहे. नियोजनबद्धरित्या या शाळेचा कारभार चालविला जात असून शाळेची शैक्षणिक प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे.
निलेश मोरजकर
सिंधुुदुर्ग : बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या शिक्षिका बांदा येथील अग्रणी असलेल्या या शाळेचा संपूर्ण कारभार हा महिलाच सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांपासून ते थेट शिपायांपर्यंत या प्रशालेत महिलाराज आहे. नियोजनबद्धरित्या या शाळेचा कारभार चालविला जात असून शाळेची शैक्षणिक प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे.
२२ वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळाने स्थापन केलेली ही शाळा आता श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या ताब्यात घेतली आहे. मंगेश कामत यांनी ५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करून संपूर्ण शाळेचा कायापालट केला आहे. प्रशालेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर या संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळतात. नर्सरीपासून दहावीपर्यंतचे वर्ग या शाळेत असून, बांदा दशक्रोशीतील ४६६ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापिका कोरगावक यांनी विभागवार समित्यांची स्थापना करून प्रत्येक समितीकडे कामांचे नियोजन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे शाळेचे संपूर्ण प्रशासन चालविण्यात येते.
पूर्व प्राथमिक विभागाची जबाबदारी चित्रलेखा नाईक, प्राथमिक विभागाची जबाबदारी हेलन रॉड्रिग्स यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपमुख्याध्यापिका रसिका वाटवे या प्रशासकीय कामात शिल्पा कोरगावकर यांना सहकार्य करतात. विज्ञान विभागाच्या प्रमुख म्हणून स्नेहा नाईक, आयबीटी व सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून रिना मोरजकर, संगणक विभागप्रमुख म्हणून धनश्री मुंगी, ग्रंथपाल म्हणून प्रीती पेडणेकर आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत आहेत. क्रीडा विभागाची जबाबदारी सुमित्रा सावंत यशस्वीपणे सांभाळत आहेत.
मैदानी, सांघिक खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्व
दैनंदिन अभ्यासाबरोबरच प्रशालेत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. विविध स्पर्धा व मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी विभाग, राज्यपातळीवर व देशपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी हे मैदानी व सांघिक खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. वक्तृत्व स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर अनेक पारितोषिके मिळविली आहेत. प्रशालेत ५0 रुपयांचा अत्याधुनिक संगणक कक्ष असून या कक्षाची जबाबदारी धनश्री मुंगी सांभाळत आहेत.
शाळेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार
रोजच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची जोड मिळावी यासाठी आय.बी.टी. तंत्रशिक्षण विषय प्रशालेत सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचा हा विषय सुरू करणारी व्ही. एन. नाबर ही महाराष्ट्रातील पहिलीच शाळा असून प्रमुखपदाची जबाबदारी रिना मोरजकर सांभाळत आहेत.
या आय. बी. टी. च्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी तंत्रशिक्षणात पारंगत झाले आहेत. अल्पावधीतच केलेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले आहे. प्रशालेला आतापर्यंत देश, विदेशातील अनेक शास्त्रज्ञ व मान्यवरांनी भेट देत शाळेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेतील महिला शिक्षिका व कर्मचारी वर्ग.