सिंधुदुर्ग : कणकवली रेल्वे स्थानकात मुलभुत सुविधांची वानवा, प्लॅटफॉर्म दोन वर छप्पराची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:31 PM2018-05-09T12:31:19+5:302018-05-09T12:31:19+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कणकवली रेल्वेस्थानक प्रवाशानी नेहमीच गजबजलेले असते. मात्र, हे रेल्वेस्थानक बांधून अनेक वर्ष झाली तरी अजूनही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर छप्पर नसल्याने भर उन्हात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दोन प्लॅेटफॉर्म जोडणाऱ्या ब्रिजवरही अशीच स्थिति असल्याने उन्हाबरोबरच पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल होत आहेत. याबरोबरच या रेल्वेस्थानकात अजूनही अनेक मुलभुत सुविधांची वानवा आहे.
सुधीर राणे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कणकवली रेल्वेस्थानक प्रवाशानी नेहमीच गजबजलेले असते. मात्र, हे रेल्वेस्थानक बांधून अनेक वर्ष झाली तरी अजूनही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर छप्पर नसल्याने भर उन्हात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोन प्लॅेटफॉर्म जोडणाऱ्या ब्रिजवरही अशीच स्थिति असल्याने उन्हाबरोबरच पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल होत आहेत. याबरोबरच या रेल्वेस्थानकात अजूनही अनेक मुलभुत सुविधांची वानवा आहे.
कोकणचे नेते प्रा. मधू दंडवते यांच्या विशेष प्रयत्नातून कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले. हे स्वप्न साकार होण्यासाठी प्रा. मधु दंडवते यांना अनेकांचा हातभार लागला. मात्र, कोकण रेल्वे जरी सुरु झाली असली तरी तिचा म्हणावा तसा फायदा सिंधुदूर्गातील जनतेला होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कणकवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म दोन वर तसेच ब्रिजवर छप्पर नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर अजूनही मुलभुत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. सिंधुदूर्गातील कणकवली रेल्वे स्थानकाचा विचार केल्यास केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक सुविधा या रेल्वे स्थानकात निर्माण केल्या.
मात्र, त्यांच्याकडे रेल्वे खाते कमी वेळ असल्याने अजूनही कणकवली रेल्वे स्थानकात अनेक मुलभुत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. नवीन केंद्रीय रेल्वेमंत्री कोकणातील जनतेच्या समस्यांकडे लक्ष देणार का? असा प्रश्न येथील जनतेतून विचारला जात आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी या रेल्वेस्थानकात सरकता जीना बसविण्यात आला आहे. मात्र, हा जीना कार्यान्वित झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून सलग अशी नियमित सेवा प्रवाशांना मिळू शकलेली नाही. अनेकवेळा हा जीना बंद असल्याचेच आढळून येते. तर या जिन्यावरुन पडून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.
कणकवली रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या काही भागात पूर्वी पासूनच छप्पर आहे. मात्र , या अपुऱ्या छप्परामुळे प्रवाशाना त्रास सहन करावा लागतो. पावसात याची तीव्रता जास्त जाणवत असते.
तर प्लॅटफॉर्म दोनवर छप्परच नाही. या प्लॅटफॉर्मवर मध्ये मध्ये काही अंतरावर प्रवाशांना विश्राम करण्यासाठी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाळ्यात गाड़ी प्लॅटफॉर्मवर आली असेल आणि पाऊस सुरु असेल तर पावसात प्रवाशांना भिजावे लागते.
प्लॅेटफॉर्म एक व दोन जोडणाऱ्या ब्रिजवरही अजुन छप्पर नसल्याने उन्हाबरोबरच पावसाळ्यातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यासारखी सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा प्लॅटफॉर्मवर छप्पर उभारणे अनेक प्रवाशांना महत्वाचे वाटते.त्यामुळे छप्पराचे हे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढायचे असल्यास कणकवली रेल्वे स्थानकात दोन काऊंटरवर सेवा उपलब्ध असते. त्यापैकी एक आरक्षित तिकीटे काढण्यासाठी असून दूसरे अनारक्षित तिकिटांसाठी आहे. कणकवली रेल्वेस्थानक प्रवाशानी नेहमीच गजबजलेले असते. त्यामुळे तिकीट काढ़ण्यासाठीही या ठिकाणी गर्दी असते.
अनारक्षित तिकीट काढण्यासाठी एकच काऊंटर असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. नियोजित प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट काढ़ताना संबधित गाडीची वेळ झाल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उड़ते. अनेक वेळा गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे धावपळ करीत विना तिकीटही अनेक प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
तिकीट आरक्षित करण्यासाठीही जादा काऊंटरची सोय करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास अंध , अपंग , वृध्द व्यक्तींची सोय होणार आहे.
प्लॅटफॉर्म दोन कडूनही प्रवेशद्वार उभारा !
कणकवली रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार प्लॅटफॉर्म एकच्या दिशेने आहे. अनेक वेळा प्लॅटफॉर्म दोन वर गाडी थांबते. त्यावेळी तिथे उतरलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातुन बाहेर पडण्यासाठी प्लॅटफॉर्म एक वर यावे लागते.
गर्दीच्यावेळी प्रवाशांना अवजड़ सामान घेवून एक प्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. त्यामुळे प्लॅटफॉर्म दोन जवळूनही प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश करता यावा अथवा तेथून स्थानकाबाहेर पड़ता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे आता नाय ऱ्हवली आमची !
कोकण रेल्वे प्रकल्प उभारताना अनेक व्यक्ति प्रकल्प बाधित झाल्या आहेत. या प्रकल्प बाधितापैकी अनेकांना अजुन न्याय मिळालेला नाही.असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच या कोकण रेल्वे मार्गावरुन अनेक गाड्या जातात. त्यांचा कोकणातील लोकांना किती फायदा होतो.हा एक संशोधनाचाच विषय आहे. कोकणातील लोकाना रेल्वेने प्रवास करताना आरक्षित तिकीटे अगोदरच फूल झाल्याचा अनुभव येत असतो.
त्यामुळे येथील लोकांना गर्दीतून अनेकवेळा उभ्यानेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रेल्वेचे नाव कोकण रेल्वे असले आणि ती कोकणातून जात असली तरी येथील जनतेला तिचा म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यामुळे 'कोकण रेल्वे आता नाय ऱ्हवली आमची' अशी प्रतिक्रिया कोकणातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.