सिंधुदुर्ग : कणकवलीत कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही : संदेश पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:41 PM2018-12-07T13:41:52+5:302018-12-07T13:42:16+5:30
कणकवली शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.
कणकवली : कणकवली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना हातात लाठ्या काठ्या घेऊन माझ्या घरासमोर मस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला? ही कणकवलीची संस्कृती आहे का? गेले तीन दिवस मी कणकवलीच्या बाहेर होतो. घडलेल्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही़.तरी देखील माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हा पुर्वनियोजित प्लान होता. त्यामुळे शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.
कणकवलीत घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांची संदेश पारकर यांनी भेट घेतली. यावेळी मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल,नगरसेवक रूपेश नार्वेकर, अनंत पिळणकर,संतोष पुजारे आदी भाजपा पदाधिकारी तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी उपस्थित होते.
कणकवली शहर हे भालचंद्र महाराजांची आणि अप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमि आहे. या भूमित कोणीही मस्ती करू नये. जर लाठ्या काठ्या घेऊन शिवीगाळ करून माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील.तर आम्हीही गप्प बसणार नाही. परंतू कणकवलीत आम्हाला शांतता नांदवायची आहे.
कणकवलीतील जनतेला कुठलाही त्रास होता नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे पोलीसांनी या हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा.त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे रेकॉर्ड तपासावे, जे दोषी असतील त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी संदेश पारकर यांनी यावेळी पोलीसांकडे केली.
ज्यावेळी या गुंडांनी माझ्या घरासमोर येऊन मस्ती केली़ त्यावेळी माजी वहिनी चक्कर येऊन खाली कोसळली.माझा भाऊ कन्हैया पारकर यालाही धक्काबुक्की केली.ही दहशत कणकवली शहरातील नागरिकांनी पाहिली आहे.
ज्यांचा संबंध नाही अशा लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या.या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा दहशत पसरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला.