सिंधुदुर्ग : पालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री !. उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:30 PM2018-07-07T16:30:12+5:302018-07-07T16:32:56+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत. दिपक केसरकर हे पालकमंत्री नसून घोषणा मंत्री झाले असल्याची टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यानी जिल्ह्याच्या विकासाची वाट लावली आहे. पाहुणे असल्यासारखे ते जिल्ह्यात येतात आणि सावंतवाड़ी पुरते मर्यादित रहातात. त्यामुळे ते फक्त सावंतवाड़ी तालुक्याचे पालकमंत्री बनले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील जनतेबाबत त्याना काही देणे घेणे नाही.
दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणेबाबत माहितीच्या अधिकारात त्यांच्या कार्यालया जवळ माहिती मागितल्यास संबधित कार्यालया कडून ती उपलब्ध करून घ्या असे सांगितले जाते. याला काय म्हणायचे ?
एखाद्या योजनेबद्दल माहिती जाहिर करायची. मात्र, त्या योजनेसाठी निधी वितरित झाला किंवा नाही याची माहिती घ्यायची नाही असे सध्या त्यांचे चालले आहे. त्यांच्या मतदार संघात चोऱ्या, दरोडे , अवैध उत्खनन सुरु आहे. जनतेकडून अर्ध नग्न स्थितीत उपोषण करण्यासारखे मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र, त्याचे त्यांना काहीच नाही.
जिल्ह्याच्या विकासासाठी 2700 कोटींचा निधी आणला, फ़ूड पार्क उभारणार , चांदा ते बांदा योजना अंतर्गत विविध विकास कामे करणार , मुख्यालय विकासासाठी 25 कोटींचा निधी आणला , तिलारी पाईप लाईन साठी निधी 100 कोटींचा निधी दिला अशा अनेक घोषणा पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.
यापैकी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध झाला ? याची काहीच माहिती त्यांच्या जवळ अथवा त्यांच्या कार्यालया जवळ नाही. त्यामुळे त्याना जर परिपूर्ण माहिती देता येत नसेल तर फक्त श्रेय घेण्यासाठी घोषणा करून जनतेची फसवणूक करु नये.
त्याचबरोबर अशा फसव्य घोषणा करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही जागरूक लोकप्रतिनिधी आहेत. ते जनतेच्या हितासाठी विविध विषयांची माहिती घेत असतात आणि ती जनतेपुढे मांडत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यानी नेमका कोणता विकास केला ते जनतेसमोर जाहिर करावे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.
सर्वच पालकमंत्री फसवणूक करणारे !
दीपक केसरकर यांच्या पूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणारेही जनतेची फसवणूक करणारेच होते. सावंतवाड़ी तहसील कार्यालयाच्या कामाची निविदा आठ वर्षापुर्वी काढण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री कोण होते? याची माहिती स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि त्यानंतर आंदोलन करावे.
चीपी विमानतळाच्या कामाचे तिन वेळा उदघाट्न नारायण राणे यानी केले आहे. तरीही या विमानतळावरुन विमान अद्याप उड्डाण करु शकलेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचे सर्वच पालकमंत्री जनतेची फसवणूक करणारे होते.असे स्पष्ट होत असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.