सिंधुदुर्गात शिवसेनेच्यावतीने महाआरती- ठिकठिकाणी रॅली-वैभव नाईक यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:52 AM2018-11-22T10:52:12+5:302018-11-22T10:55:16+5:30
कणकवली : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्यादृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या माध्यमातून हिंदुच्या ...
कणकवली : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्यादृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या माध्यमातून हिंदुच्या अस्तित्वाचा देशव्यापी मुद्दा हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्देत दाखल होणार आहेत. त्यादिवशी साधुसंताच्या विविध आखाडयांना भेट देवुन शरयू नदीकिनारी श्रीरामाची महाआरती ते करणार आहेत. यापार्श्वभुमीवर सिंधुदुर्गात रॅली द्वारे विविध मंदिरांमध्ये शिवसैनिक व तमाम हिंदु बांधव श्रीरामाची महाआरती करणार असल्याची माहीती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कणकवली येथील विजय भवन येथे बुधवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर उपस्थित होते. अरुण दुधवडकर म्हणाले , उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिंधुदुर्गातुन फक्त प्रमुख पदाधिकारी अयोध्या येथे जाणार आहेत. युवासेना, महिलाआघाडी व जेष्ठ शिवसैनिक या दौऱ्यासाठी जाणार नाहीत. प्रभु श्रीराम यांचे मंदिर उभारण्यासाठी हा शिवसेनेचा महत्वपुर्ण दौरा असल्याने देशातील शिवसैनिक अयोध्देला जाणार आहेत.
आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गात कणकवलीसह आठही तालुक्यात प्रभुश्रीरामाची महाआरती शिवसैनिक व हिंदु बांधव 24 नोव्हेंबर रोजी करतील. ठिकठिकाणी रॅली काढुन अयोध्देतील प्रभु श्रीरामाच्या मंदिर उभारण्यासाठी समर्थन देण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्देला गेल्यानंतर २५ नोव्हेंबरला श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे जाहीर सभाही होणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या रॅली व महाआरतीमध्ये शिवसैनिकांबरोबर हिंदूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.