सिंधुदुर्ग : एनआरएचएमचे आंदोलन सुरुच, मनसेच्या शिष्टमंडळाने दिली भेट, माजी खासदारांनी केली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 15:31 IST2018-04-20T15:31:21+5:302018-04-20T15:31:21+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनाला गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत चर्चा केली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर एनआरएचएमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मनसेच्या शिष्टमंडळातील नितीन सरदेसाई, परशुराम उपरकर, धीरज परब, राजन दाभोलकर यांनी भेट दिली.
ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनाला गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत चर्चा केली.
एनआरएचएम कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे. सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे. त्यासाठी असलेली वयाची आत शिथिल करावी. कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम, समान वेतन कायदा लागू करावा. आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये. सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.
कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन आठव्या दिवशी सुरुच होते. या आंदोलनाला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली आणि चर्चा करीत स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा दिला. तसेच मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
मनसेच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासन
आंदोलनकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, शिरीष सावंत, सत्यवान दळवी, मनीष चव्हाण उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली.