सिंधुदुर्ग : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला, सावंतवाडीतील समस्या : बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:41 AM2018-09-25T11:41:56+5:302018-09-25T11:45:20+5:30
सावंतवाडी शहरात भटक्या जनावरांसोबत अलीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांबरोबर वाहन चालकांना ही मोठी समस्या बनून राहिली आहे.
सिंधुदुर्ग : शहरात भटक्या जनावरांसोबत अलीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांबरोबर वाहन चालकांना ही मोठी समस्या बनून राहिली आहे.
सावंतवाडी शहरात प्रत्येक भागात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक वेळा पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र ठोस अशी कोणतीच कारवाई पालिका करु शकली नाही.
अलीकडे भटक्या जनावरांवर पालिकेने दंडात्मक कारवाई हाती घेतली. शिवाय ही कारवाई तशीच सुरु ठेवली आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात या भटक्या जनावरांपासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्यामुळे वाहनचालक, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, लहान मुले यांना भीती निर्माण झाली आहे.
बरेचदा पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्र्रवही नागरिकांना सहन करावा लागत असून, या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासन घेणार का, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
भररस्त्यात असलेल्या कुत्र्यामुळे अनेकांना अपघाताचा सामनाही करावा लागला आहे. यामध्ये मोठ्या दुखापतीलाही सामोरे जावे लागले आहे. कुत्र्यांची उत्पत्ती रोखली गेल्यास हळूहळू ही समस्या सुटू शकते. मात्र नसबंदी प्रक्रिया हाती घेण्याचे धाडस पालिका प्रशासनाने घ्यावे. त्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांनी प्राशासनावर दबाव आणला पाहिजे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
कुडाळ नगरपंचायतीने अलीकडेच कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
शहरात पालिका प्रशासन स्वच्छतेवर अधिक भर देत आहे. मात्र भटक्या कुत्र्यांकडून शहरात ठिकठिकाणी घाण करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांचे चावा घेण्याचेही प्रकारही वाढले आहेत. कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून याला वेळीच लगाम बसणे गरजेचे आहे.
तोडगा काढण्याचा प्रयत्न
शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर ही गंभीर समस्या पालिकेला भेडसावत आहे. यापूर्वी पालिकेने नसबंदीचा उपाय करुन पाहिला. मात्र, त्यातून म्हणावा तसा फायदा झाला नाही. नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.