सिंधुदुर्ग : कबड्डी स्पर्धेत ओम कल्याण ठाणे संघ विजेता, शाहू सडोली कोल्हापूर संघ उपविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:39 PM2018-02-27T17:39:37+5:302018-02-27T17:39:37+5:30
कणकवली येथील कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम कल्याण ठाणे संघाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तर शाहू सडोली कोल्हापूर संघ या स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरसीच्या खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे अगदी पारणे फेडले.
कणकवली : येथील कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम कल्याण ठाणे संघाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तर शाहू सडोली कोल्हापूर संघ या स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. रविवारी रात्री उशिरा रंगलेल्या या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरसीच्या खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे अगदी पारणे फेडले.
येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर प्रकाशझोतात सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कुणाल बागवे स्मृती चषक २०१८ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी प्रारंभ झालेल्या या निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेत सलग तीन दिवस क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार पहायला मिळाला.
कबड्डी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या शाहू सडोली कोल्हापूर संघालाही पारितोषिक देण्यात आले.
राज्यभरातील नामवंत कबड्डीपटूंनी या स्पर्धेच्या निमित्ताने कणकवलीत हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचा खेळ येथील क्रीडारसिकांना तसेच नवोदित कबड्डीपटूंना पहाता आला. कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भैरवनाथ नाचणी, कोल्हापूर हा संघ पराभूत झाला होता.
दुसऱ्या बाजूच्या उपांत्य फेरीतील सामन्यात एन.पी.एम. रायगड हा संघ पराभूत झाला होता. या पराभूत झालेल्या दोन्ही संघांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. दोन्ही संघांना प्रत्येकी रोख १० हजार रुपये व कुणाल चषक देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या ओम कल्याण ठाणे संघाला प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ४१ हजार व कुणाल चषक तसेच उपविजेत्या शाहू सडोली कोल्हापूर संघाला रोख रुपये ३१ हजार व कुणाल चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ओम कल्याण ठाणे संघाचा शशांक हळदणकर हा ठरला. त्याला रोख ४ हजार व चषक देण्यात आला.
उत्कृष्ट पकडीसाठी शाहू सडोली, कोल्हापूर संघाच्या अक्षय पाटील याला रोख रुपये ३ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाईसाठी एन.पी.एम. रायगड संघाच्या स्मितील पाटील याला रोख रुपये ३ हजार व चषक देण्यात आला.
अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून ओम कल्याण ठाणे संघाच्या प्रशांत जाधव याला गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील विजेत्या संघातील खेळाडूंना सुवर्ण पदक तसेच उपविजेत्या संघातील खेळाडूंना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भाजप नेते संदेश पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, राजश्री धुमाळे, परेश बागवे, दिलीप साटम, एम. बी.जाधव, महेश कुडाळकर, अमोल टकले, अमित मयेकर, हितेश मालंडकर, हरेश निखार्गे, निनाद दीपनाईक, शशांक बोर्डवेकर, सुभाष राणे, विशाल डामरी, गौरव हर्णे, महेश सावंत, महेंद्र मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैभव नाईक उपस्थित
सलग १३ वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या या कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विद्यामंदिरच्या पटांगणावर हजेरी लावली. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळातर्फे संदेश पारकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.