सिंधुदुर्ग : मालवण येथे पर्यटन व्यवस्थापन शिक्षणाची संधी उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:14 PM2018-09-14T12:14:22+5:302018-09-14T12:18:28+5:30
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.
नवी दिल्ली/सिंधुदुर्ग : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.
या निर्णयाबाबत प्रभु यांनी अल्फॉन्स यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे. या पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग-मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरु झाल्याने स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कोकणपट्टयात पर्यटन व्यवसायास आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच या भागाच्या सर्वंक प्रगतीसाठीही ही संस्था महत्वपूर्ण ठरेल. कोकणाला 700 कि.मी.ची किनारपट्टी लाभली असून याठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण आहे.
रम्य निसर्ग व सागरी किना-यांमुळे कोकणात कायम देश- विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते या संस्थेच्या स्थापनेमुळे या भागातील पर्यटन विकासाला गती येणार असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला आहे.
सोयीच्या जागी संस्था उभारण्यात यावी
रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हयातील सोयीच्या जागी प्रस्तावित आयआयटीटीएमची शाखा उभारण्यात यावी तसेच या संस्थेमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी अशी विनंती प्रभु यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे केली आहे. संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे.