सिंधुदुर्ग : अवैध धंद्यांविरोधात काढला मोर्चा, मोंड येथील महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:00 PM2018-03-21T16:00:25+5:302018-03-21T16:00:25+5:30
मोंड व मोंडपार गावातील अवैध दारूधंदे, मटका, जुगार बंदीबाबत तेथील महिलांनी देवगड पोलीस स्थानकावर मंगळवारी दुपारी धडक मोर्चा काढला. अवैध धंद्यांबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोंड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच विभा माणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याबाबत पोलीस व तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महिलांना दिले.
देवगड : मोंड व मोंडपार गावातील अवैध दारूधंदे, मटका, जुगार बंदीबाबत तेथील महिलांनी देवगड पोलीस स्थानकावर मंगळवारी दुपारी धडक मोर्चा काढला. अवैध धंद्यांबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोंड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच विभा माणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याबाबत पोलीस व तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महिलांना दिले.
यावेळी मोंड ग्रामपंचायत सदस्या स्वाती कोळसुमकर, माजी सरपंच स्मिता अनभवणे, समाजसेविका प्राची तिर्लोटकर, अर्चना अनभवणे, वर्षा तांबे, अस्मिता अनभवणे, वासंती मुणगेकर, शामल अनभवणे, सुप्रिया अनभवणे, संध्या अनभवणे, मयुरी अनभवणे आदींसह सुमारे १५० ते २०० महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
मोंड गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव हे व्यसनमुक्त झालेच पाहिजे, गावातील दारूधंदे १०० टक्के आणि कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत, अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या. यावेळी माणगांवकर म्हणाल्या, मोंड व मोंडपार गावांमध्ये सुरू असलेल्या दारूधंद्यांबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून लहान शाळकरी मुलेदेखील या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. स्त्रियांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे गावातील दारूधंदे कायमस्वरुपी बंद झालेच पाहिजेत. गावातील दारूधंदे कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आम्ही मोर्चे काढतच राहणार आहोत. अवैध दारूधंद्यांबरोबरच मटका, जुगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषापायी गावातील लोक व तरुण आपली दिवसाची रोजीरोटी पणाला लावत आहेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी मोंड सरपंच प्रदीप कोयंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजाराम राणे, सामाजिक कार्यकर्ते अभय बापट आदी उपस्थित होते.
वरिष्ठांनाही निवेदन
यावेळी महिलांच्यावतीने देवगड तहसीलदार वनिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयालाही धडक देत दारूधंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी या वरिष्ठांनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे विभा माणगावकर यांनी यावेळी सांगितले.