सिंधुदुर्ग : बिबट्याची दहशत; बैल, कुत्र्याचा फडशा, कर्लीतील घटना, भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:10 PM2018-03-20T18:10:44+5:302018-03-20T18:10:44+5:30
मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत असलेल्या डरकाळीने संपूर्ण गाव सुन्न होत आहे.
मालवण : मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत असलेल्या डरकाळीने संपूर्ण गाव सुन्न होत आहे.
मालवण सागरी महामार्गावर वसलेल्या परुळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कर्ली गाव येतो. चिपी विमानतळापासून जंगलमय भागात बिबट्यांची वसतिस्थाने आहेत. मात्र या बिबट्यांची दहशत कधी जाणवली नव्हती. मात्र महिनाभर एक मोठा बिबट्या अनेकांना दिसून येत आहे. गावातील अनेक कुत्रे या बिबट्याची शिकार बनली आहेत. दोन दिवसांपूर्वी गावातील श्यामसुंदर पिंगुळकर यांच्या छोट्या बैलाचा या बिबट्याने फडशा पाडला.
याबाबत वन अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला मात्र बिबट्याला पकडण्याबाबत पिंजरा लावणे व इतर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अगदी लोकवस्ती पर्यंत हा बिबट्या येत असल्याने ग्रामस्थ, लहान मुले व वाहनचालक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वाहनचालक तर आपल्यासोबत संरक्षक वस्तू घेऊन प्रवास करत आहेत.
रात्री उशिरा तर या मार्गावरून दुचाकीस्वार आपला प्रवासही टाळत असल्याची माहिती ग्रामस्थ कालिदास चिपकर, दीपक दुधवडकर व प्रकाश करंगुटकर यांनी दिली आहे.