सिंधुदुर्ग :उर्दू शिक्षक मिळत नसल्याने पालकांचे शाळा बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:19 PM2018-12-08T15:19:02+5:302018-12-08T15:20:04+5:30
मागणी करूनही शिक्षण विभागाकडून मालवण तालुक्यातील आचरा उर्दू शाळेला मंजूर कोठ्याप्रमाणे शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे शुक्रवारी आचरा उर्दु शाळा मुलाविनाच सुरू झाली होती.
सिंधुदुर्ग : मागणी करूनही शिक्षण विभागाकडून मालवण तालुक्यातील आचरा उर्दू शाळेला मंजूर कोठ्याप्रमाणे शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे शुक्रवारी आचरा उर्दु शाळा मुलाविनाच सुरू झाली होती.
यावेळी पालकांच्या झालेल्या बैठकीत जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे निक्षून सांगत शासनाला आवश्यक शिक्षक देता येत नसतील तर शाळा खासगी करण्यासाठी परवानगी द्या आम्ही चालविण्यास सक्षम असल्याचे उपस्थित पालकांमधून सांगण्यात आले.
यावेळी रियाज काझी, अस्मा मुजावर, जाफर काझी, नजमुद्दीन शेख, अश्फाक मुजावर, रियान काझी, जफरूल्ला काझी, नबिला काझी, उज्मा मुजावर, अन्शा मुजावर, समिना काझी, शहनाज अन्सारी, तब्बस्सूम मुजावर, आलम अन्सारी, शबाना मुजावर, रशिद काझी, मनवर शहा यांसह अन्य पालक आदी उपस्थित होते.
बेचाळीस पटसंख्या आणि इयत्ता आठवी पर्यंत वर्ग असलेल्या आचरा येथील मंजूर चार शिक्षकांपैकी केवळ दोनच शिक्षक येथे कार्यरत आहेत. यापैकी एका शिक्षकाला अधून-मधून कामगिरीवर काढत असल्याने बेचाळीस मुलांची जबाबदारी केवळ एकाच शिक्षकावर येते.
याबाबत येथील पालकांनी गेल्या महिनाभरापासून पटसंख्येचा विचार करून या शाळेसाठी आवश्यक ते शिक्षक देण्याची मागणी केली होती. पण पालकांच्या मागणीला शिक्षण विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.
त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी सात डिसेंबर पासून जो पर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे शुक्रवारी शाळा उघडली होती पण शाळेत मुलेच नाहीत अशी स्थिती होती.