सिंधुदुर्ग : पारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता : अतुल काळसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:22 PM2018-12-08T15:22:47+5:302018-12-08T15:25:05+5:30
नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सर्वांना तडीपार करा अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्गनगरी : कणकवली कॉलेज परिसरात झालेली मारहाण व त्यानंतर संदेश पारकर यांच्या घरावर झालेला हल्ला या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. यावरून पारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता असे दिसून येते. त्यामुळे पारकर यांना पोलीस संरक्षण द्यावे.
या घटनेत सहभागी असलेल्या नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सर्वांना तडीपार करा अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली येथे ५ डिसेंबर रोजी भाजपा व स्वाभिमान पक्षातील कार्यकर्ते भिडले होते. परिणामी गाड्यांची तोडफोड करून वातावरण तंग झाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, संदेश पारकर, राजू राऊळ, राजन वराडकर, संदेश पटेल, अवधूत मालणकर उपस्थित होते.
अधीक्षकांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काळसेकर म्हणाले, बुधवारी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ मारामारी झाली. यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य जणांनी संदेश पारकर यांच्या घरावर हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड केली.
सुदैवाने संदेश पारकर व त्यांचे कुटुंबीय घरात नसल्याने जीवावर बेतणारा प्रसंग घडला नाही. दुर्दैव म्हणजे नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून दहशत निर्माण करत होते. पोलिसांसमोर देखील त्याच आवेशात फिरत होते. यामुळे या घटनेचा परिणामही कणकवलीतील नागरिकांच्या मनोधैर्यावर झाला आहे.
ते आमचे कार्यकर्ते नाहीत
कॉलेज परिसरात झालेल्या मारामारीचा भाजपाशी काडीचाही संबंध नाही. कॉलेज युवकांना मारहाण करणारे तरूण हे भाजप पक्षाशी निगडीत नसल्याचे अतुल काळसेकर यांनी अधीक्षक गेडाम यांना सांगितले. तर या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन गेडाम यांनी शिष्टमंडळाला दिले.