सिंधुदुर्ग : नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:04 PM2018-07-12T15:04:26+5:302018-07-12T15:07:52+5:30
सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला.
कनेडी : सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला.
या शाळेत प्राथमिकचे पहिली ते चौथी व अंगणवाडीचे वर्ग चालविले जातात. शाळा रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रहदारी जास्त आहे. केंद्रप्रमुख, दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत. पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या या शाळेमध्ये सात वर्ग होते. सध्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळेत पहिली ते चौथीचेच वर्ग सुरू आहेत.
बाकीचे वर्ग नादुरूस्त आहेत. हे नादुरूस्त वर्ग पडण्याच्या स्थितीत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने हे वर्ग निर्लेखित करण्यासंदर्भात बांधकाम तसेच शिक्षण विभागाला गेल्यावर्षी ठराव दिला होता. परंतु, सुशेगात असणाऱ्या शासनाने दखल न घेतल्याने ही घटना घडली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
गावाच्या मध्यभागी असलेल्या या शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या याच वर्गात विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. केंद्रबलाचे केंद्रप्रमुख याच शाळेमध्ये बसतात. शाळेच्या आवारात अंगणवाडी असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची रेलचेल येथे असते. विद्यार्थी शाळेत जेथून प्रवेश करतात त्या प्रवेशद्वारावरच हा अपघात घडला आहे.
शासन बेफिकीर
ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याची पाहणी केली. शासनाच्या बेफिकीरीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संभाव्य अपघाताची शक्यता ओळखून गेल्यावर्षी या खोल्यांचे निर्लेखन करण्यासंदर्भाचे पत्र संबंधित खात्याला देण्यात आले होते. परंतु, बेफिकीर राहिलेल्या शासनाने त्याची दखल घेतली नाही.
शासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे. अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळला. नादुरूस्त वर्ग तत्काळ निर्लेखित न केल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.