सिंधुदूर्ग : नाणारला विरोध करणाऱ्यांचे झोपेचे सोंग : प्रमोद जठार यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:47 PM2018-07-03T13:47:30+5:302018-07-03T13:50:22+5:30
सिंधुदूर्गातील बेरोजगारी कमी होण्यासाठी नाणार प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी कोणतीही माहिती न घेता जाणून बुजुन झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टिका भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केली.
कणकवली : सिंधुदूर्गातील बेरोजगारी कमी होण्यासाठी नाणार प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी कोणतीही माहिती न घेता जाणून बुजुन झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे कसे करणार ?अशी सध्याची स्थिती आहे. अशी टिका भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी जयदेव कदम, राजन चिके, संतोष किंजवडेकर, बबलू सावंत उपस्थित होते.
प्रमोद जठार पुढे म्हणाले, नाणारला विरोध करणारे दोन्ही पक्ष सत्तेच्या जवळ आहेत. त्यामुळे त्याना प्रकल्पाबाबत जे आक्षेप आहेत त्याबद्दल ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु शकतात. तसेच आवश्यकता भासल्यास पर्यावरण आणि पुनर्वसन याबाबत शासनाचे प्रतिज्ञा पत्र घेऊ शकतात. मात्र, ते तसे करताना दिसत नाहीत. प्रकल्पाबाबत सत्य माहिती जाणून घेण्याची तसदी ते घेत नाहीत. तर जनतेमध्ये फक्त संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खासगीमध्ये हे नेते निवडणुकीत आपल्या पक्षाला निवडून येता यावे यासाठी प्रकल्पाला आम्ही विरोध करत असल्याचे सांगत असतात. त्यामुळे त्यांचे जनतेबद्दल बेगड़ी प्रेम असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्ष असून त्यांचा म्हणावा तसा विरोध होताना दिसत नसल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कोकणच्या विकासाची उंची विजयदुर्ग सारख्या खोल समुद्रात दडली आहे. या खोल समुद्रात मोठी जहाजे उभी रहावू शकतात. मुंबई तसेच इतर ठिकाणी समुद्र गाळाने भरला आहे. हा गाळ काढायचा झाल्यास कोठयावधी रूपये खर्च होणार आहेत. त्यामुळे जिथे समुद्राची खोली जास्त आहे तेथील बंदराचा विकास झाल्यास रोजगार निर्मिती होणार आहे.
श्री गणेश चतुर्थी पूर्वी मुंबई गोवा महामार्गाची नवीन एक लेन पूर्ण होईल . त्यामुळे वाहनचालकाना खराब रस्ते तसेच खड्यामुळे होणारा त्रास कमी होईल. कणकवली शहर तसेच 'क्' वर्ग नगरपंचायत हद्दीत प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना दोन गुणांक द्यावा. यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार केला असून मुख्यमंत्र्यांकडे तो पाठविला आहे. आगामी अधिवेशनात त्याबाबत ते घोषणा करतील. त्यामुळे हा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जोपर्यन्त दोन गुणांक दिला जात नाही तोपर्यन्त काम करु दिले जाणार नाही. आम्ही जनतेसोबतच आहोत.असेही जठार यावेळी म्हणाले.
... तर राजकीय संन्यास घेईन !
नाणार प्रकल्प होणार असलेल्या ठिकाणी माझी एक फूट जमीन जरी असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी दाखवून दिले तर आपण राजकीय संन्यास घेऊ . येथील तरुणांना रोजगार मिळावा. तसेच रोजगार उपलब्ध झाल्याने कोकणातील 50 टक्के बंद असलेली घरे उघडावित ही आपली इच्छा आहे. त्यासाठीच नाणार सारखे प्रकल्प व्हावेत असे मला वाटते. यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही. असे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.