सिंधुदुर्ग : नाटककाराने एकच बाजू लेखनात मांडू नये : प्रेमानंद गज्वी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:17 PM2018-12-26T16:17:54+5:302018-12-26T16:20:01+5:30

नाटककाराने भूमिकेची एकच बाजू आपल्या लेखनातून मांडू नये.तर सर्व समाज समजून घ्यायला हवा, असे मत अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.

Sindhudurg: The playwright should not write one side: Premanand Gajvi's opinion | सिंधुदुर्ग : नाटककाराने एकच बाजू लेखनात मांडू नये : प्रेमानंद गज्वी यांचे मत

कणकवली येथे जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत प्रा. डॉ. अनिल फराकटे यानी घेतली.

Next
ठळक मुद्देनाटककाराने एकच बाजू लेखनात मांडू नये : प्रेमानंद गज्वी यांचे मतनाथ पै एकांकिका स्पर्धेवेळी कणकवली येथे प्रकट मुलाखत

कणकवली : माणसे आता जात आणि पोटजातीतही अडकून पडली आहेत. लेखकाने प्रश्न उपस्थित करण्यासाठी लिहायला हवे आणि प्रश्नांच्या बाजूनेच उभे राहायला हवे. नाटककाराने भूमिकेची एकच बाजू आपल्या लेखनातून मांडू नये.तर सर्व समाज समजून घ्यायला हवा, असे मत अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.

येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या एकेचाळिसाव्या बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धेच्यावेळी प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी घेतलेल्या या मुलाखतीच्या वेळी प्रेमानंद गज्वी यांनी आपला जीवन प्रवास उलगड़ला.

यावेळी नाट्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वामन पंडित, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक प्रा .अविनाश कोल्हे, अभिनेते प्रमोद माने उपस्थित होते.

प्रेमानंद गज्वी म्हणाले, माझ्यावर बालपणापासून बुद्ध विचारांचे संस्कार झाले . त्या विचारातूनच मी पुढे नाटकाचा विचार करू लागलो. शाळेत असताना नाटकात मी भूमिका करायचो . परंतु पुढे मी कधी नाटक लिहीन असे मला त्यावेळी वाटले नव्हते. मात्र माझे पहिले लेखन महाविद्यालयाच्या मासिकात प्रसिद्ध झाले.

कविता , कथा अशा प्रकारचे लेखनही केले. पण ते कोणाला कधी दाखविले नाही. जेव्हा 'घोटभर पाणी 'ही पहिली एकांकिका लिहिली त्यावेळी बाबा आढावांची' एक गाव एक पाणवठा 'चळवळ सुरू होती. आंबेडकरांच्या चवदार पाण्याचा, रोहिणी नदीचा या एकांकिकेला संदर्भ आहे. या एकांकिकेपासूनच माझ्या लक्षात आले की, मी नाटकाच्या फॉर्म मधून चांगले लिहू शकतो.

या एकांकिकेचे आजवर तीन हजार प्रयोग झाले आहेत. अशावेळी नाट्यचळवळ पुढे जाणे महत्त्वाचे असते. लेखन करताना पैसे मिळतील अशी आशा बाळगायची नाही. 'देव नवरी ' ही एकांकिका वर्तमानपत्रातील बातमीवरून मला सुचली.

पु.ल. देशपांडे यांनी या एकांकिकेमध्ये मांडलेल्या देवदासी परंपरे संदर्भात इथे असे घडू शकते. दुसरे काही नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. ही एकांकिका दिल्ली आकाशवाणीवर नभोनाट्यात प्रसारित होणार होती, मात्र तिचा शेवट बदलायला मी नकार दिल्याने ती तिथे सादर होऊ शकली नाही.

मी सामाजिक व्यवस्थेचा विचार करतो आणि व्यामिश्र जगणे नाटकात मांडतो. मी कधीही कोणत्याही गटातटात राहिलो नाही. दलित नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर मला नाटकवाले जयभीम वाला बोलू लागले. तर जय जय रघुवीर हे नाटक लिहिल्यावर काही ब्राह्मनानी मला विचारले तुला तुझ्या समाजाचे प्रश्न नाहीत का? मी मात्र सगळ्या समाजाचे प्रश्न माझे समजून हे जग सुंदर कसे करता येईल यासाठीच लिहितो.

'तन माजुरी' या नाटकाबद्दल अनेक डाव्या चळवळीवाल्यांना मी आपला लेखक वाटलो. पण मी अशा कुठल्या विचाराने नाटक लिहीत नाही.जगात 6800 जाती आहेत त्या सगळ्यांनी मला स्वीकारले तर आनंदच होईल. आजही देशात गांधी, आंबेडकरांनाच सर्वाधिक मानतात. गांधी-आंबेडकर अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी झटत होते. पण ते एकत्र आले नाहीत. याचा शोध घेण्यासाठी मी गांधी-आंबेडकर नाटक लिहिले.

मी गांधी , आंबेडकर यांच्यापैकी कुणाच्या बाजूने आहे, यापेक्षा मी प्रश्नांच्या बाजूने आहे हे मला महत्त्वाचे वाटते. लेखकाने प्रश्नांच्या बाजूने उभे राहताना सत्यासाठी भांडायला हवे आणि स्वतःच्या लेखनाची जबाबदारी स्वतः स्वीकारायला हवी.

लेखक लिहितो तेव्हापासूनच त्याला धोक्याला सामोरे जावे लागते. आता लेखक भूमिका फार घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. लेखकाने भूमिका घ्यायला हवी. भूमिका घेऊन जर जीव जात असेल तर बिघडलं कुठे? तो देण्याचीही तयारी लेखकाने ठेवावी असेही प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी सांगितले.
 

 

Web Title: Sindhudurg: The playwright should not write one side: Premanand Gajvi's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.