सिंधुदुर्ग : मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:43 PM2018-08-04T16:43:19+5:302018-08-04T16:47:27+5:30
चार मराठा कार्यकर्त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अॅड. हर्षद गावडे यांनी दिली.
कणकवली : ओसरगांव ओवळीये तिठा प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या चार मराठा कार्यकर्त्यांना गेले सात दिवस पोलीस कोठडीत आंघोळीसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्याची पुरेशी व्यवस्था जाणिवपूर्वक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अॅड. हर्षद गावडे यांनी दिली.
कणकवली येथील मराठा समाज संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाई परब, बाबू राऊळ, गांवकर, राजू राणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते़
यावेळी अॅड. हर्षद गावडे म्हणाले, बाळासाहेब सुर्यवंशी, आशितोष सावंत, रामचंद्र बोरगावे, तुकाराम लाड या चार मराठा कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे. ही बाब आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने संबधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
संशयित आरोपींच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्याचे काम पोलीस अधिकाºयांनी केले आहे. मराठा समाजाचे आंदोलक असल्यानेच पोलिसांनी संबधितांना नाहक त्रास दिलेला आहे. याबद्दल संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात मराठा समाजाच्यावतीने लवकरच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.
तसेच मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अॅड. हर्षद गावडे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सात दिवस आंघोळ न केल्याने मराठा बांधवांचे स्वास्थ्य बिघडले आहे. पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे जर त्यांची प्रकृती खालावली तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असेही अॅड. गावडे यांनी यावेळी सांगितले.
पाणी पुरवठा सहा महिने बंद!
पोलीस कोठडीची इमारत उपकोषागार कार्यालयाच्या मालकीची आहे. मागील ६ महिन्यांपासून कोठडीच्या इमारतीत पाणीपुरवठा बंद आहे . त्यामुळे आम्हालाही अडचणी सहन कराव्या लागत आहेत. कोठडीतील आरोपींना नैसर्गिक विधीसाठी कस्टडी गार्ड पोलीस खांद्यावरून पाणी आणून देतात. याबाबत तहसीलदारांना कल्पना दिली आहे.
संशयित आरोपींना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, गार्डनी याबाबत कल्पना दिली नाही. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे ही तहसीलदार आणि बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली .