सिंधुदुर्ग : पोलिसांशी बाचाबाची; कुडाळात काही काळ तणावाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:24 PM2018-04-20T15:24:37+5:302018-04-20T15:24:37+5:30
दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.
कुडाळ : झाराप येथील महामार्गाचे चौपदरीकरण करताना वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच दक्षता न घेतल्याने या ठिकाणी अपघातात पाच बळी गेले असून झाराप-जांभरमळा येथील दुचाकी व टँकर यांच्यात झालेला अपघात व ज्ञानेश्वर ताम्हाणेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.
या आंदोलनानंतर पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्यावरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्ते व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने कुडाळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाराप जांभरमळा बसस्टॉप येथील महामार्गावर घडलेल्या टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक ज्ञानेश्वर रामचंद्र ताम्हाणेकर (४२, रा. नमसवाडी माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
यावेळी या ठिकाणी जमलेल्या नागरिक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी या अपघाताला महामार्गाचे काम करणारी दिलीप बिल्डकॉनची कंपनीच जबाबदार आहे. कारण त्यांनी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना येथे केलेली नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. याच झाराप परिसरातील हा पाचवा बळी असून या अपघातप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी बुधवारी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी केली होती.
या ठिय्या आंदोलनात भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, राजू कविटकर, नगराध्यक्ष विनायक राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सामंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक नारकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजन नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, बंड्या कुडतरकर, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक ओंकार तेली, सुनील बांदेकर, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, राकेश कांदे, संतोष शिरसाट, राजू तेंडोलकर, सरपंच स्वाती तेंडोलकर, संदीप राऊळ, सरपंच अनुप नाईक, सतीश कुडाळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र आपल्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिल्याने शेवटी कुडाळ पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनचे संपर्क अधिकारी रवी कुमार यांना कुडाळ पोलीस ठाण्यात तत्काळ बोलावून त्यांच्याशी आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यास सांगितले.
आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची नाही तर तुम्ही त्यांना अटक करा मगच आम्ही आंदोलन मागे घेतो, अशी ठाम भूमिका घेतली. या नंतर काही वेळाने पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांनी या अपघातप्रकरणी संबंधित ठेकेदाराची योग्य ती चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.