सिंधुदुर्ग : वाळू व्यावसायिक-ग्रामस्थ हाणामारी प्रकरणी सात जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:32 PM2018-05-19T15:32:16+5:302018-05-19T15:32:16+5:30
सरंबळ-बागवाडी येथील कर्ली नदीपात्राच्या किनारी वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांच्या मिळून १० जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ७ ग्रामस्थांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कुडाळ : सरंबळ-बागवाडी येथील कर्ली नदीपात्राच्या किनारी वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांच्या मिळून १० जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ७ ग्रामस्थांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर तीन वाळू व्यावसायिकांची जामिनावर मुक्तता केली. मात्र त्यांना ३१ मेपर्यंत सरंबळ गावात जाण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.
या हाणामारीत एकूण १२ जण गंभीर जखमी झाले होते. यात महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या मिळून सुमारे ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाळू वाहतुकीमुळे सरंबळ येथील रस्ता खड्डेमय व वाहतुकीस अयोग्य झाल्याचा आरोप करत येथील ग्रामस्थांनी वारंवार वाळू वाहतुकीचे डंपर रोखून धरीत आंदोलने केली होती. त्यातच गुरूवारी सकाळी पुन्हा वाळू वाहतूक बंद आंदोलन छेडल्यानंतर येथे आलेले प्रभारी तहसीलदार टी. एच. मठकर यांनी येथील ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाहीत, तोपर्यंत येथील वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते.
दरम्यान, सायंकाळी वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत सुमारे १२ जण जखमी झाले. यात लोखंडी फावडे, दांडे, कोयता, दगड यांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये वाळू व्यावसायिक अमोल कदम व महिला ग्रामस्थ सुचित्रा भोवर या गंभीर जखमी झाल्या होत्या. यातील वाळू व्यावसायिक अमोल कदम यांना अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यामध्ये सुधीर भोवर यांनी तक्रार दिली की, येथील रस्ता खराब झाल्याने आंदोलन केल्यामुळे येथील ग्रामस्थ व वाळू व्यावसायिक यांच्यामध्ये वाद आहे. येथील गुरूवारचे आंदोलन मठकर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते.
याच दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सरंबळ येथील आमच्या घरी जात असताना येथील रॅम्पवर कशाप्रकारे वाळू उपसा केली जात आहे. हे पाहण्यासाठी सर्वजण गेले असता तेथील वाळू व्यावसायिक योगेश नाईक, भालचंद्र नाईक, दत्ताराम वराडकर, नीलेश कदम यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या २० ते २५ जणांनी गैरकायदा जमाव करीत आम्हा ग्रामस्थांना फावडे, लाकडी दांडे, दगड, पिडे यांनी मारहाण केली.
यामध्ये पुरूष व महिला गंभीर जखमी झाले. सुधीर भोवर यांच्या तक्रारीनुसार वाळू व्यावसायिक योगेश नाईक (३३), दत्ताराम वराडकर (३२), भालचंद्र नाईक (३८), नीलेश कदम, नारायण कदम यांच्यासहीत २० ते २५ अज्ञात व्यक्ती विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी योगेश नाईक, दत्ताराम वराडकर, भालचंद्र नाईक यांना अटक करण्यात आली.
याबाबतची माहिती मिळताच वराडकर हे तत्काळ रॅम्पवर गेले असता त्या ठिकाणी वाळू व्यावसायिक योगेश नाईक यांचे मॅनेजर अमोल कदम व इतर वाळू व्यावसायिक तसेच २० ते २५ ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांपैकी मिलिंद भोवर यांच्या हातात लोखंडी कोयता होता तर सुधीर भोवर यांच्या हातात फावडे व अन्य लोकांच्या हातात लाकडी दांडे होते.
यावेळी या ग्रामस्थांना समाजावण्याकरिता अमोल कदम हे पुढे गेले असता ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी शिवीगाळ करीत तुम्ही वाळूच्या पैशावर माजला आहात, असे सांगत यातील काहींनी अमोल कदम यांना मागाहून पकडले व याच वेळी रघुनाथ भोवर यांना हातातील फावड्याने अमोलच्या तोंडावर जोरदार वार करून गंभीर जखमी केले.
यावेळी अमोल खाली पडताच या ग्रामस्थांनी हातातील लाकडी दाड्यांनी नारायण कदम, सीताराम कदम, रवींद्र कदम, निलेश कदम, आपल्याला व अन्य जमलेल्या सर्वांना मारहाण करीत तुमचे हात-पाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. तसेच रॅम्पवरील दुचाकी, लाकडी रॅम्प, प्लायवूड, भैय्यांच्या झोपड्यांची तोडफोड करून नुकसान केले.
दत्ताराम वराडकर यांच्या तक्रारीनुसार सरंबळ ग्रामस्थांपैकी रोशन साटम (२८), शामसुंदर करलकर (२८), रघुनाथ भोवर (२३), मिलिंद हळदणकर (२४), सुभाष दांडकर (४८), सुधीर भोवर (५५), नीलेश हळदणकर (३४), नंदकिशोर भोवर, सुधीर भोवर, सुचित्रा भोवर, रवींद्र भोवर व किशोर भोवर यांची पत्नी यांच्यासहित सुमारे २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रोशन साटम, शामसुंदर करलकर, रघुनाथ भोवर, मिलिंद हळदणकर, सुभाष दांडकर, सुधीर भोवर, नीलेश हळदणकर या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
ग्रामस्थांना कोठडी, व्यावसायिकांना जामीन
च्सरंबळ-बागवाडी येथे झालेल्या हाणामारीतील वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांना न्यायालयात हजर केले असता ग्रामस्थांच्यावतीने अॅड. विवेक मांडकुलकर यांनी सांगितले की, गेले अनेक दिवस ग्रामस्थ रस्त्यासाठी आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनातूनच हा हाणामारीचा प्रकार घडला. ग्रामस्थांपैकी एका महिलेला गंभीर दुखापत होऊन सुध्दा ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीमध्ये जामीन पात्र कलमे लावण्यात आली. आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांविरूध्द कडक कलमे लावली हे चुकीचे आहे, असे सांगितले. तर सरकारी वकिलांनी सांगितले की, या हाणामारीत वापरलेली हत्यारे व अन्य ग्रामस्थांना पकडायचे असल्यामुळे पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली.
च्दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाळू व्यावसायिक योगेश नाईक, दत्ताराम वराडकर, भालचंद्र नाईक यांची जामीनावर मुक्तता करून ३१ मे पर्यंत सरंबळ गावात जाण्यास मनाई केली. तर ग्रामस्थ रोशन साटम, शामसुंदर करलकर, रघुनाथ भोवर, मिलिंद हळदणकर, सुभाष दांडकर, सुधीर भोवर, निलेश हळदणकर या सात जणांना सोमवार २१ मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.