सिंधुदुर्गनगरी पोलीस दलाची विघ्नहर्ता १०० योजना
By Admin | Published: August 28, 2014 09:24 PM2014-08-28T21:24:44+5:302014-08-28T22:22:51+5:30
पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या संकल्पनेतून सुरू
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत गरजू व्यक्तींना तत्काळ रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे ‘विघ्नहर्ता १०० योजना’ पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे.
जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात आणि इतर आजारपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना अनेकवेळा रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रूग्णास जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी अशा रूग्णाचे प्राण वाचावेत आणि जनता- पोलीस यांच्यामधील सौदार्हाचे नाते अधिक दृढ व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून ‘विघ्नहर्ता १०० योजना’ गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे सुमारे १३०० संख्येचे मनुष्यबळ आहे. या योजनेंतर्गत स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रक्तगटाची माहिती नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे येथे संकलित करून उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे.
ज्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये त्यांची गरज सांगितल्यावर संबंधित रक्तगटाच्या स्वेच्छेने रक्तदान करणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल आणि त्यांच्याकडून रक्तदान केले जाईल, असे या योजनेचे स्वरूप आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या उपस्थितीत योजनेचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू, पोलीस उपअधीक्षक आरोसकर, इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, चौरे व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)