सिंधुदुर्ग : राजकीय हाणामारी प्रकरणी पारकर-नलावडे गटाच्या २० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:29 PM2018-12-07T13:29:57+5:302018-12-07T13:32:32+5:30

कणकवली शहरात दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी नलावडे गटाच्या १३ जणांना तर पारकर गटाच्या ७ जणांना  पोलिसांनी अटक केली. त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही गटाच्या २० जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अखेर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Sindhudurg: Political Action Case: 20 people arrested for Parkar-Nalawade group | सिंधुदुर्ग : राजकीय हाणामारी प्रकरणी पारकर-नलावडे गटाच्या २० जणांना अटक

कणकवली न्यायालयात नलावडे गटाच्या संशयीत आरोपींना हजर करताना पोलीस

Next
ठळक मुद्देराजकीय हाणामारी प्रकरण : पारकर-नलावडे गटाच्या २० जणांना अटकशहरात तणावपूर्ण शांतता !

कणकवली : कणकवली शहरात दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी नलावडे गटाच्या १३ जणांना तर पारकर गटाच्या ७ जणांना  पोलिसांनी अटक केली. त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही गटाच्या २० जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अखेर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली महाविद्यालयात युवकाला मारहाण झाल्याच्या पार्श्वभुमीवर संदेश पारकर यांच्या घरासमोर गाडयांची तोडफोड, गैरकायदा जमाव, लाठयाचा वापर करुन दहशत, शिवीगाळ, धमकी, आरडाओरड केल्याप्रकरणी नगराध्यक्ष समिर नलावडे व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

त्यामुळे समीर नलावडे , माजी नगरसेवक किशोर राणे, बांधकाम सभापती अभिजीत मुसळे, नगरसेवक बंडु हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष राकेश राणे, राजा पाटकर, संदीप नलावडे, निखिल आचरेकर, जावेद शेख, पंकज पेडणेकर , विजय इंगळे गुरूवारी सकाळी ११.४० वा़जता स्वत:हून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले.

त्यांच्यावर रितसर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुपारी त्याना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या आरोपींच्यावतीने जामिनासाठी अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. राजेश परुळेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यानुसार सर्व आरोपींना जामिन मंजूर झाला आहे. या गटातील एका अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


कणकवली न्यायालयात पारकर गटाच्या संशयीत आरोपींना हजर करताना पोलीस़

याच प्रकरणात कणकवली महाविद्यालय परिसरात जीवन दिनेश राणे व त्याचा मित्र भावेश कमलाकर निग्रे यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संशयीत आरोपी आदीत्य सापळे, ऋषी वाळके, गौरव सरूडकर, योगेश कोरगावकर, राहुल पेटकर, अक्षय घुरसाळे, शुभम पेडणेकर या सात जणांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुपारी हजेरी लावली.

पोलीसांनी या सातही आरोपींवर अटकेची कारवाई करून न्यायालयात हजर केले. त्यानाही न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपींच्या जामिनासाठी अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. भूषण भिसुरे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन सातही आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे.

या प्रकरणात नाव आलेला एक युवक घटना घड़ली तेव्हा महाविद्यालयातील वर्गात असल्याचा पुरावा सादर करण्यात आल्याने त्याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी बाजू मांडली.

शहरात तणावपूर्ण शांतता !

संदेश पारकर यांच्या घरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलिसांची अधिक कुमक वाढविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी या हाणामारीच्या घटनेचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Sindhudurg: Political Action Case: 20 people arrested for Parkar-Nalawade group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.