सिंधुदुर्ग : मनगटातील ताकद हीच आपली जात : नाना पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 05:01 PM2018-04-23T17:01:55+5:302018-04-23T17:01:55+5:30
नाटळ ग्रामविकास मंडळ आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नदी पुनर्जीवन कामाचा शुभारंभ शनिवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
कनेडी : मी जात मानत नाही. आपल्या मनगटातील ताकद हीच आपली जात आहे. जातीधर्माचे सर्व समाजातून समूळ उच्चाटन झाले पाहिजे. तरच गावात एकसंध सांघिकपणा वाढून गाव सुजलाम् सुफलाम् होईल आणि शहरात गेलेली पिढी पुन्हा एकदा गावाकडे येईल, असा विश्वास नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अभिनेते नाना पाटेकर यांनी नाटळ ग्रामवासीयांना दिला.
नाटळ ग्रामविकास मंडळ आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नदी पुनर्जीवन कामाचा शुभारंभ शनिवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, यांत्रिकीकरणामुळे अनेक तरुणांवर बेकारीची कुºहाड कोसळली. बेकारीचा भस्मासूर सर्वत्र थैमान घालू लागला. यावर आजच्या तरुणांनीच मात केली पाहिजे. छोटे छोटे व्यवसाय उभे करून रोजगार निर्मिती केली पाहिजे. परिस्थितीचे भान ठेऊन मनापासून काम केल्यास काहीही शक्य होते. हे करीत असताना कुठल्याही सन्मानाची अपेक्षा करू नये.
काम करायला मिळणे हाच एक मोठा सन्मान आहे. प्रचंड वाढत असलेल्या लोकसंख्येला कुठेतरी आळा बसला पाहिजे. अन्यथा अनर्थ होईल. यासाठी तुमच्यामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, नाम फाऊंडेशनचे राजू सावंत, सरपंच सुजाता सावंत, देवस्थान प्रमुख आप्पाजी सावंत, नाटळ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत, सचिव अनिल सावंत, भालचंद्र सावंत, बबन सावंत, सदा सावंत, संजीव सावंत, अजय सावंत, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी, ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत, संदेश पारकर यांनी मार्गदर्शन केले. अनिल सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या उपक्रमांना सुरुवातीपासून येणाऱ्या अडचणी, आपण त्यावर केलेली मात आणि आता प्रत्यक्ष झालेली सुरुवात याबाबत सविस्तर कथन केले.
रामेश्वर मंदिरानजीक असलेल्या नाटळ नदीमध्ये प्रत्यक्ष नदी पुनर्जीवन उपक्रमाचा शुभारंभ नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन नाना पाटेकर यांनी केले.
नाम फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य : राणे
आमदार नीतेश राणे म्हणाले, ग्रामविकास मंडळ नाटळ व नाम फाऊंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेला नदी सुधार कार्यक्रम खरोखरच स्तुत्य असा आहे. नाम फाऊंडेशनचे हे काम नि:स्वार्थीपणे चालले आहे. कुठलेही काम करताना कोकणी माणूस मागे-पुढे पाहत नाही. नेहमीच तो सकारात्मक असतो. नदी सुधार उपक्रमाला आपण केव्हाही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सांगत त्यांनी या उपक्रमास एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.