सिंधुदुर्ग : भाविकांच्या उपस्थितीत कुणकेरी हुडोत्सव उत्साहात, पाथर उचलण्याचे खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:18 PM2018-03-08T17:18:33+5:302018-03-08T17:18:33+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे बुधवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे बुधवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
घोडेमोडणी, वाघाचा खेळ, पारंपरिक पाथर (धनगरणीचा दगड) उचलण्याचे खेळही पार पडले. कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध धार्मिकतेत मानाचा असतो. प्रथेप्रमाणे या हुडोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी श्री भावई देवीचे तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढू लागले. यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारांवर दगड मारण्याची प्रथाही पार पडली. एकूण पाचवेळा दगड मारण्यात आले.
हुडोत्सवादरम्यान तेथे पांरपरिक खेळही पार पडले. यात रोंबाटासह हुड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी, वाघाची शिकार आदींचा सहभाग होता. ज्यावेळी गावातील रोंबाट भावई देवीच्या मंदिराकडे आले, त्यावेळी हे खेळ खेळण्यात आले. हुडोत्सवात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठी गर्दी उसळली होती. यात महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.