सिंधुदुर्ग : तांबोळी येथे वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने म्हैस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:12 PM2018-06-11T14:12:46+5:302018-06-11T14:12:46+5:30
वीज खांबावरून तुटून खाली पडलेल्या वीजवाहिनीला चरणाऱ्या गाभण म्हशीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तांबोळी येथे घडली. यामुळे भरत बुधाजी सावंत यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बांदा : वीज खांबावरून तुटून खाली पडलेल्या वीजवाहिनीला चरणाऱ्या गाभण म्हशीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तांबोळी येथे घडली. यामुळे भरत बुधाजी सावंत यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सावंत यांनी नेहमीप्रमाणे आपली म्हैस तेथील माळरानावर चरायला सोडली होती. याठिकाणी वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडली होती. त्यातून वीजप्रवाह सुरूच होता. चरत असलेल्या म्हशीला विजेचा धक्का लागल्याने ती जागीच गतप्राण झाली. हे सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वीज वितरण कार्यालयाला कळविले.
त्यामुळे त्वरित वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बांदा पोलिसांत याची माहिती मिळताच हवालदार बाबू तेली यांनी याठिकाणी जात पंचनामा केला. मोरगाव येथील डॉ. सोनटक्के यांनी म्हशीचे विच्छेदन केले.
ही वीजवाहिनी जमिनीवर पडली होती. त्यातून वीजप्रवाहही सुरू होता. सुदैवाने मोठा पाऊस असल्याने या परिसरात माणसांचा वावर नव्हता. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.