सिंधुुदुर्ग : आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे, पोलीस अधीक्षकांकडून शासनाला प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:31 AM2018-04-06T10:31:07+5:302018-04-06T10:31:07+5:30
सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दिली आहे.
सिंधुुदुर्ग : सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दिली आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी पर्यटन दृष्ट्या प्रसिध्द असलेल्या आंबोलीचे नाव गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. पंजाबमधील ड्रग्स तस्करी करणाऱ्या युवकाने गळफास लावून घेतला होता. त्यानंतर सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या कोथळेचा मृतदेह पोलिसांनी आंबोलीत टाकला होता. गडहिंग्लज येथील शिक्षकाचा खून करून मृतदेह आंबोली- कावळेसाद येथे आणून टाकला होता. तर राधानगरी तालुक्यातील मुलगा व मुलगी यांनी याच ठिकाणी आत्महत्या केली होती.
गृहराज्यमंत्री केसरकर यांनी आंबोलीला भेट देऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे होण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अधीक्षक कार्यालयाने शासनाकडे प्रस्तावही सादर केला असून, या ठिकाणी पर्यटन पोलीस ठाण्यासाठी मंजुरी दिली जाईल, अशी आशा आहे.
सध्या आंबोलीत मोठ्या प्रमाणात पोलीस दल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याशिवाय आंबोलीत पेट्रोलिंगसाठी खास कारही देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीने पोलिसांना गस्त घालणे अवघड जात होते. आता कारमुळे गस्त घालणेही सोपे झाले आहे. आंबोलीत मे महिन्यात पर्यटक दाखल होणार असल्याने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.