सिंधुदुर्ग : नॅशनल मेडिकल कमिशनचा निषेध, कुडाळात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:47 IST2018-03-12T15:47:07+5:302018-03-12T15:47:07+5:30
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने केंद्र सरकार आणू पहात असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध व निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने रविवारी कुडाळ शहरातून निषेधाच्या घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी डॉक्टर व समाजाला हितकारक ठरणाऱ्याच निर्णयासोबत राहणार असल्याचे आश्वासन असोसिएशनला दिले.

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या निषेधार्थ कुडाळ येथे आयोजित सायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी खासदार विनायक राऊत, संजय पडते, अमरसेन सावंत यांच्यासह डॉ. राजेश्वर उबाळे, संजय केसरे, जयसिंग निगुडकर, संजीव आकेरकर, संजय निगुडकर, जयेंद्र परूळेकर व डॉक्टर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने केंद्र सरकार आणू पहात असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध व निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने रविवारी कुडाळ शहरातून निषेधाच्या घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी डॉक्टर व समाजाला हितकारक ठरणाऱ्याच निर्णयासोबत राहणार असल्याचे आश्वासन असोसिएशनला दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रॅली कुडाळ शहरातून काढण्यात आली. कुडाळ हायस्कूल ते जिजामाता चौक, शिवाजी चौक, समादेवी मंदिर, बाजारपेठ, गांधी चौक व पुन्हा कुडाळ हायस्कूल अशी रॅली काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तसेच कुडाळ, मालवण, सावंतवाडी तालुक्यांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन, कुडाळचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, कणकवलीचे अध्यक्ष डॉ. नितीन शेट्ये, डॉ. अनिल नेरूरकर, सचिव डॉ. संजय केसरे, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. संजय निगुडकर, डॉ. योगेश नवांगुळ, राजेश नवांगुळ, प्रवीण बिरमोळे, डॉ. मकरंद परूळेकर, डॉ. शंतनू पावसकर, अमोल पावसकर, सुधीर रेडकर, डॉ. श्रुती सामंत, डॉ. विशाखा पाटील, डॉ. गौरी परूळेकर, डॉ. संजना केसरे, डॉ. सुशांता कुलकर्णी, डॉ. अश्विनी खानोलकर, डॉ. जी. टी. राणे, डॉ. धीरज सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. केसरे यांनी सांगितले की, केंद्र्र सरकार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्यावतीने आणू पहात असलेले नॅशनल मेडिकल कमिशन हे विधेयक अंमलात आल्यास देशातील वैद्यकीय क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तसेच डॉक्टरांना व जनतेला त्रासदायक ठरणार आहे.
या विधेयकामुळे छोटे दवाखाने बंद पडून उपचार खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा त्रास देशातील सर्व जनतेला सहन करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत, असे सांगितले.
समाजहिताच्या दृष्टीने समाजातील सर्व व्यक्तींनी हे विधेयक मंजूर होऊ नये म्हणून सर्व स्तरातून याच्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही डॉ. केसरे यांनी जनतेला केले. या सायकल रॅलीत जिल्ह्यातील बहुसंख्य डॉक्टरांनी सहभाग घेतला. विधेयकाच्या विरोधात निषेधाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीच्यावेळी पोलीस विभागानेही विशेष सहकार्य केल्याचे डॉ. केसरे यांनी सांगितले.
असोसिएशनने निवेदनातून वेधले खासदारांचे लक्ष
यावेळी खासदार राऊत यांना असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले. हे विधेयक किती धोकादायक आहे याबाबत राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राऊत यांनी हे बिल मंजुरीसाठी पुन्हा एकदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहात येईल, त्यावेळी डॉक्टर व समाजहिताच्या दृष्टीने आम्ही बाजू मांडू व तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही दिली. तसेच इतरही लेखी समस्या देण्याचे आवाहन केले.