सिंधुदुर्ग : जनजागृतीअगोदरच नॉन ओव्हन पिशव्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक : कन्हैया पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:35 PM2018-11-03T17:35:16+5:302018-11-03T17:37:22+5:30
कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. यात व्यापारी बांधवांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला, अशी भूमिका नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मांडली.
सिंधुदुर्ग : कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. यात व्यापारी बांधवांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला, अशी भूमिका नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मांडली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़
यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, महेश सावंत आदी उपस्थित होते. कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली शहरात यापूर्वीही आम्ही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली होती. तसेच व्यापाऱ्यांकडील प्लास्टिक जप्तही केले होते. पण गुरुवारी करण्यात आलेली कारवाई चुकीची होती. पूर्वग्रहदूषित आणि सर्वच व्यापारी बांधव चोर आहेत असे समजून त्यांच्या दुकानांवर धाडी टाकल्या जात होत्या. शहराच्या जडणघडणीत व्यापारी हा घटक महत्त्वाचा आहे. असे असताना ऐन दिवाळी सणात अशी कारवाई योग्य म्हणता येणार नाही.
प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यापूर्वी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण मुख्याधिकाऱ्यांनी काही मोजक्याच व्यापाऱ्यांना घेऊन बैठक घेतली. त्यात आम्हां लोकप्रतिनिधींनाही बोलाविण्यात आले नाही. तसेच दिवाळी सण आटोपल्यानंतर प्लास्टिक बंदीची कारवाई होणे आवश्यक होते.
दंडात्मक कारवाईची रक्कम परत करावी !
आम्ही सत्तेत असताना प्लास्टिक बंदी करण्यापूर्वी जनप्रबोधन केले. कार्यशाळा घेतल्या. प्लास्टिकला पर्याय अशा कापडी आणि कागदी पिशव्या वाटल्या. तसेच थेट दंड न करता प्रथम जप्तीची कारवाई केली. पण सध्याचे नगरपंचायत प्रशासन दंडेलशाहीपणे कारवाई करीत आहे. शहरातील व्यापाऱ्याकडे प्लास्टिक पिशव्या नव्हत्या, तर नॉनओव्हन आणि पॉलीप्रॉपीलेन पिशव्या होत्या म्हणून कारवाई झाली आहे. याबाबत झालेली दंडात्मक कारवाईची रक्कम नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना परत करावी, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी यावेळी केली.