सिंधुदुर्ग : मुसळेच्या घरावर छापा, गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:36 PM2018-01-11T18:36:43+5:302018-01-11T18:40:18+5:30
गेल्या पाच महिन्यांत गोवा बनावटीच्या अवैध दारुसाठ्यावर तीन मोठ्या कारवाया केल्या असतानाही अवैध दारू विक्रेता चेतन प्रमोद मुसळे याच्या घरावर पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल तीन लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू हस्तगत केली.
मालवण : गेल्या पाच महिन्यांत गोवा बनावटीच्या अवैध दारुसाठ्यावर तीन मोठ्या कारवाया केल्या असतानाही अवैध दारू विक्रेता चेतन प्रमोद मुसळे याच्या घरावर पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल तीन लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू हस्तगत केली.
यात विविध दहा प्रकारचा बिअर व दारूसाठा आढळून आला. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री सुकळवाड येथे आरोपी मुसळेच्या घरावर ही कारवाई केली.
अवैध दारुसाठा बाळगणे व विक्री करणेप्रकरणात चेतन मुसळे हा मास्टरमार्इंड बनला आहे. मालवण पोलिसांनी जून महिन्यात दोनवेळा कारवाई करताना तीन लाख रुपयांची तर आॅगस्ट महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनखाली टाकण्यात आलेल्या छाप्यात ३२ हजारांची गोवा बनावटीची अवैध दारू सापडली होती. त्यानंतरही मुसळे याने खुलेआम दारू विक्री सुरू ठेवली.
त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ विभागाने मंगळवारी रात्री तीन लाखांची मोठी कारवाई केली आहे. घरात अवैध दारुसाठा ठेवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये आरोपी चेतन प्रमोद मुसळे (रा. सुकळवाड, ता. मालवण) याच्यावर गुन्हा दाखल करीत मुद्देमालासहीत अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभाग यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळ, कणकवली व निरीक्षक भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकत ही दहा विविध दारूप्रकारात तब्बल ३ लाख ३ हजार ४८० रुपयांची कारवाई केली. याप्रकरणी आरोपीस अटकही करण्यात आली असून अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे कुडाळचे निरीक्षक करीत आहेत.
पाच महिन्यांतील चौथी कारवाई
सुकळवाड बाजारपेठ येथे राहणाऱ्या चेतन मुसळे याच्या घरावर पोलिसांनी जून महिन्यात दोन वेळा तर जिल्हा पोलिसांनी आॅगस्ट महिन्यात कारवाई केली होती. यात चार लाखांची दारू जप्त करण्यात आली.
त्यामुळे शिवसेना पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या मुसळेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मालवण पोलिसांनी १० जून रोजी सुमारे १ लाख रुपये किमतीची दारू जप्त करून पहिली कारवाई केली होती.
त्यानंतर अवघ्या २० दिवसांनी ३० जून रोजी तब्बल २ लाखांहून अधिक किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूसाठ्यावर छापा टाकला होता. त्यानंतर ५ आॅगस्ट रोजी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी छापा टाकून ३२ हजार रुपयांच्या दारू साठ्यावर कारवाई केली होती. आता १० जानेवारी रोजी ३ लाखांची दारू हस्तगत करण्यात आली.