सिंधुदुर्ग : राजीव साबळेच निवडून येणार : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:14 PM2018-05-04T15:14:25+5:302018-05-04T15:14:25+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसेवेची नाळ असलेले अॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे़ ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला़.
कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसेवेची नाळ असलेले अॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे़ ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला़.
कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़. यावेळी शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, उमेदवार अॅड. राजीव साबळे, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, अॅड. हर्षद गावडे, शैलेश भोगले, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब आदी पदाधिकारी उपस्थित होते़.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अॅड. राजीव साबळे रिंगणात उतरले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत आढावा बैठका मतदारांसमवेत झाल्या आहेत. १२ वर्षांपूर्वी शिवसेनेचे अनंत तरे या मतदारसंघातून विजयी झाले होते.
विनायक राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेचे उमेदवार अॅड. राजीव साबळे हे सामाजिक सेवेचे ज्ञान असलेले आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. तीनही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे़ या ताकदीच्या जोरावर आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा विजय शिवसेना संपादन करेल. शिवसेना-भाजपा या विधानपरिषद निवडणुकीसाठी युती करून लढत आहे. प्रत्येकी
तीन जागांवर सेना-भाजपा युती लढत आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाबाबत सेना-भाजपमध्ये चर्चा सुरू असून लवकरच एकमताने निर्णय होईल, असे खासदार राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले़.
आमदार उदय सामंत म्हणाले, अॅड. राजीव साबळे यांचा या निवडणुकीत विजय होणार आहे. शिवसेना-भाजपचे लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे मतदान करतील. त्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आढावा घेण्यात आला आहे.
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजन साळवी यांच्या पुढाकाराने आमचा विरोध आहे. कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रिफायनरीला आमचा विरोध : साबळे
यावेळी अॅड. राजीव साबळे म्हणाले, या तीनही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ४५० हून अधिक मते आहेत़. मी पाचवेळा रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. कोकणच्या प्रश्नांबाबत पुढील काळात शिवसेना नेत्यांच्या भूमिकेसोबत आपण राहणार आहे़. प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला माझा कायम विरोध राहणार आहे.
शिवसेना-भाजप एकत्र लढत असल्यामुळे या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या विश्वासाने मला उमेदवारी दिली आहे़ त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोकणात पुढील काळात काम करीत राहणार आहे.