सिंधुदुर्ग : अतिंद्र सरवड़ीकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:55 PM2018-07-25T15:55:29+5:302018-07-25T15:59:58+5:30
मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिन्द्र सरवडीकर यांच्या सुमधुर सुरांनी संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे.
कणकवली : मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिन्द्र सरवडीकर यांच्या सुमधुर सुरांनी संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे.
गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे 19 वे पुष्प डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून रविवारी गुंफले.
अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित केलेल्या या गंधर्व संगीत सभेचा आस्वाद घेण्याची संधी कणकवलीकरांना या निमित्ताने लाभली.
डॉ अतिंद्र सरवडीकर हे अभिजात शास्त्रीय संगीतातले आजच्या युवा पिढीतले देशपातळीवरचे शीर्षस्थ नाव आहे. प्रतिभावान गायक असण्याबरोबरच रचनाकार, गीतकार, लेखक, संगीत संशोधक, गुरू असेही अनेक पैलू त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाला आहेत.
आशिये येथील कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविक गंधर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी केले . डॉ अतिन्द्र सरवड़ीकर यांनी प्रसंगोचित मियाँ की मल्हार रागामध्ये विलंबित व द्रुत बंदिश आकर्षक रितीने सादर केली. सुरांचा मल्हार सुरु असतानाच निसर्गामध्ये सरींचा मल्हार सुरु झाला आणि वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर बिहाग रागामधील त्यांची स्वरचित बंदिश व गुरू स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे रचित एक तराणा त्यांनी सादर केला.
"जमुना किनारे मोरा गाव "या मांज खमाज रागातील दादरा गाऊन डॉ. अतिन्द्र यांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मिश्र परमेश्वरी रागातील ' रंजल्या गांजल्या अपुला म्हणे जनार्दन' या आर्त स्वरातील अभंगाने वातावरण भक्तिमय बनले.
स्वर, लय, ताल यांवरील असलेल्या प्रभुत्वाबरोबरच नादमय व सुस्पष्ट शब्दोच्चारण, काव्याची व विविध गानप्रकारांच्या वैशिष्ट्यांची उत्तम समज, आवाजाचा उत्तम व वैविध्यपूर्ण वापर तसेच संवेदनशील व भावपूर्ण गायन, स्वत:चा विशिष्ट संगीत विचार यांमुळे डॉ . अतिंद्र सरवडीकर यांचं गाणं ऐकणं हा रसिकांसाठी एक विलक्षण समाधान देणारा सुंदर अनुभव होता.
मध्यांतरानंतर कवी प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांची प्रकट मुलाखत घेतली. किराणा घराण्याच्या शैलीतील अनेक बारकावे, त्याचा इतिहास खूप छान पद्धतीने डॉ. अतिंद्र यांनी मांडला. आपल्या जीवनातील अनेक चढउतार , गुरूंची शिकवण, गुरुबद्दलचं प्रेम, रियाज यावर खूप सुंदर रीतीने त्यांनी भाष्य केले.
आज विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांत शास्त्रीय संगीताला जागा फार कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसाद कुलकर्णी यांच्या विनंतीने "कळीचे फुल होताना कळीने काय मागावे" हे भावगीत त्यांनी सुंदररीत्या सादर केले. ही मुलाखत खूपच रंगली. अनेक श्रोतेही यात उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.
" शास्त्रोक्त संगीत ऐकणारे कान निर्माण करणे आणि ते निर्माण करताना चांगली मने निर्माण करणे हे फारच कठीण काम आहे, अर्थातच गंधर्व फाउंडेशनचे हे कठीण काम दखलपात्र आहे" अशा शुभेच्छा कवी प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी गंधर्व संगीत सभेला दिल्या. कार्यक्रमाचा शेवट "मुखी नाम तुझे रे गोविंद "या भैरवीने डॉ.अतीन्द्र सरवड़ीकर यांनी केला.
या कार्यक्रमात हार्मोनियमवर रत्नागिरी येथिल मधुसूदन लेले यांनी तर तबल्यावर कुडाळ येथिल सिद्धेश कुंटे यांनी अतिशय उत्तम साथसंगत केली. डॉ अतिंद्र सरवडीकर यांचे शिष्य मंदार जडये व मयूर कुलकर्णी यांनी तानपुऱ्यावर तसेच एबी वर्गीस यांनी स्वरमंडलावर साथ केली.
19 वी गंधर्व संगीत सभा ही कणकवलीमध्ये शास्त्रीय संगीत रुजविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या संगीत साधक व गुरु संध्या पटवर्धन यांनी आपला मुलगा अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रायोजित केली होती .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष सुतार, किशोर सोगम, शाम सावंत, सिने अभिनेते अभय खडपकर, दामोदर खानोलकर, विलास खानोलकर, मनोज मेस्त्री, मनीषा पालव, स्नेहा खानोलकर, लता खानोलकर ,राजू करंबेळकर, बाबु गुरव, संतोष जोशी तसेच आशिये दत्त मंदिर समिती व गंधर्व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
19 ऑगस्ट रोजी 20 वी गंधर्व सभा !
गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथे 19 आॅगस्ट रोजी 20 वी गंधर्व संगीत सभा पं. राम देशपांडे यांचे शिष्य आदित्य मोडक यांच्या गायनाने रंगणार आहे. असे यावेळी जाहिर करण्यात आले.