सिंधुदुर्ग-रत्नागिरी डीएड, बीएडधारक आक्रमक, ठोस निर्णय न झाल्यास उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:30 PM2018-05-16T16:30:32+5:302018-05-16T16:30:32+5:30
शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डी.एड्., बी.एड्.धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्याविरोधातही येथील तरुणाईने संताप व्यक्त केला.
सिंधुदुर्गनगरी : न्याय द्या, आम्हांला न्याय द्या... तावडे साहेब न्याय द्या; शाळा आमची पोरा आमची... शिक्षक कित्याक भायलो... अशी गाणी ढोलकीच्या तालावर सादर करीत येथील डी.एड्., बी.एड्.धारकांनी उपोषणाचा दुसरा दिवस गाजवला.
शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डी.एड्., बी.एड्.धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्याविरोधातही येथील तरुणाईने संताप व्यक्त केला.
बुधवारी सायंकाळपर्यंत आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास उपोषण सुरू करून आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर यांनी दिली.
शिक्षक भरतीत स्थानिकांवर वारंवार अन्याय होत आहे. त्यातच शिक्षक भरती परीक्षेत गुण वाढवून देणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. २०१० सालीही असे रॅकेट कार्यरत असल्याचे पुरावेदेखील पोलिसांकडे देण्यात आले.
मागील आठ वर्षे शिक्षक भरती झाली नसल्याने डी.एड्., बी.एड्.पर्यंतचे शिक्षण घेऊन अनेकजण बेकार झाले. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधून स्थानिक शिक्षक भरतीची मागणी जोर धरू लागली आहे.
२०१० साली शिक्षक भरती झाली त्यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करण्यात आले. आताही तेच धोरण रेटले जात असल्याने हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
शासनाचे लक्ष वेधावे यासाठी विविध अन्याय व्यक्त करणारी गाणी उपोषणात सादर करण्यात आली.
उपस्थितांनीही ढोलकीचा ठेका धरीत गाणी सादर करून अन्याय व्यक्त केला. या जन्मात शिक्षक झालो पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही, अशी व्यथा या गाण्यांमधून मांडण्यात आली. प्रभुदास आसगावकर यांनी गीत गायिले. अक्षय सातार्डेकर यांनी ढोलकी साथ केली.
१४ मे पासून सुरू असलेल्या उपोषणात रणरागिणींचा सहभाग मोठ्या संख्येने आहे. स्थानिकांना न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा,आमच्या भावनांशी खेळू नका, असा रोखठोक इशाराही या रणरागिणींनी यावेळी दिला.
लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष
सलग दोन दिवस डी.एड्., बी.एड्.धारकांनी उपोषण केले. परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र पाठ फिरविली. निवडणुका आल्या की मते मागायला येणाऱ्या व तरुणाईची बिरुदावली मिरविणाऱ्या नेत्यांना आमच्यावरील अन्यायाचा विसर पडला की काय? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्यांनी केला. आमचा प्रश्न मार्गी न लावल्यास येथील लोकप्रतिनिधींना त्यांची जागा निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
..चिमुकल्यांसह मातांची उपस्थिती
शासनाच्या सातत्याने बदलणाऱ्या धोरणाचा फटका तरुणांसह, तरुणींनाही बसला. याचा निषेध करण्यासाठी या उपोषणात आपल्या चिमुकल्यांसह काही माता उपस्थित राहिल्या आहेत. राज्यकर्त्यांनो आता तरी न्याय द्या, अशी आर्त हाक यावेळी त्यांनी दिली. अनेकांचे पालकही या उपोषणात सामील झाले आहेत.