सिंधुदुर्ग : रिफायनरी प्रकल्पाविरोधी आझाद मैदानावर १४, १५ मार्च रोजी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:02 AM2018-03-14T11:02:19+5:302018-03-14T11:02:19+5:30
मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.
देवगड : मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.
रामेश्वर ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये रविवारी सायंकाळी उशिरा घेण्यात आलेल्या विशेष सभेत प्रकल्पबाधित जमीन मालकांनी पुन्हा धरणे आंदोलनातून प्रकल्पविरोधी एकजूट शासनाला दाखविण्याचा निर्धार केला.
विनाशकारी रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत संघर्ष कायम राहिल. रिफायनरी प्रकल्पबाधित भूमिपुत्रांची भूमिका मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्यात येणार असून गिर्ये-रामेश्वरसह राजापूर-नाणार परिसरातील जमीन मालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सुरेश केळकर यांनी सांगितले आहे.
यावेळी सरपंच विनोद सुके, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, महमंदअली मुकादम, मिलेश बांदकर, मधुकर गिरकर, भरत घारकर, रमेश अणुसरकर तसेच सुमारे २५० हून अधिक ग्रामस्थ जमीन मालक व महिला आदी उपस्थित होते.
विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर यापूर्वी प्रकल्पाविरोधी मुंबईच्या आझार मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल का घेतली जात नाही? प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक जनतेमध्ये जमीन मालकांमध्ये शासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत प्रचंड संताप आहे.
जमीन भूसंपादनाच्या नोटिसांना येथील जमीन मालकांनी विरोधाचे लेखी उत्तर देऊनही रिफायनरीची टांगती तलवार येथील भुमिपुत्रांवर शासनाने का ठेवली आहे. त्यामुळे अधिवेशन काळातच शासनाला प्रकल्पाबाबत तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन छेडले आहे.
ग्रामस्थांचा सहभाग
या आंदोलनात गिर्ये-रामेश्वर व राजापूर-नाणारसह प्रकल्पबाधित गावातील जमीन मालक, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. अधिवेशनात विधानभवनामध्ये भाजपचे आमदार सोडून इतर सर्वपक्षीय आमदार रिफायनरी प्रकल्पाविरोधी मत मांडणार असून त्याचवेळी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु राहणार आहे.